जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती नगरीत प्रशासनाच्यावतीने स्वागत

Photo of author

By Sandhya

बारामती दि. २६ : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बारामती शहरामध्ये ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम..ज्ञानोबा माऊली तुकाराम… च्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. पाटस रोडवरील देशमुख चौकात प्रशासनाच्यावतीने पालखी रथ आणि दिंड्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी खासदार सुनेत्रा पवार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरपरिषेदेकडून वारकऱ्यांसाठी सुविधा आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नगरपरिषदेने पूर्वतयारी केली आहे. शारदा प्रांगण व नगरपरिषद परिसरात वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालखी मार्गावरील सर्व रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी फिरत्या शौचालयाची सोय करण्यात आली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करून संपूर्ण शहरात धूर फवारणी करण्यात आली आहे.

‘हरित वारी-सुरक्षित वारी’ च्या माध्यमातून शहरात वृक्षारोपण करण्यात येत आहे. शहरात प्लास्टिकमुक्त बारामती, प्रदूषणमुक्त वारी व पर्यावरण हरित संतुलनासाठी जनजागृतीविषयक उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरात कचरा कुंडी, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, सूचना फलक, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आदी व्यवस्था करण्यात आली असून ध्वनीक्षेपकाद्वारे सूचनाही देण्यात येत आहे.

बारामती शहरात चौकाचौकात विविध संस्था संघटना यांच्याकडून पालखी रथाचे व दिंड्याचे स्वागत करण्यासाठी मंडप उभारण्यात आले आहेत. काही सेवाभावी संस्थांकडून वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा, अल्पोपहार, फळे, पाणी पुरवठा व इतर सेवा पुरवण्यात येत आहेत.

या पालखी सोहळ्यात महाराष्ट्र शासनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, आरोग्य विभाग, कौशल्य व उद्योजकता विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण, वन विभाग आदी विभागांच्या चित्ररथातून शासनाच्या योजनांविषयी जनजागृती करण्यात येत असून या चित्ररथास वारकऱ्यांचा आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page