
गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात मोठा तणाव बघायला मिळत आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानने अफगाण सीमावर्ती भागात हवाई हल्ला केला होता. यानंतर अफगाणिस्ताननेही पाकिस्तानला जोरदार उत्तर देत थेट पाकिस्तानी सैन्य चौक्यांना टार्गेट करत हल्ला चढवला.
या हल्ल्यात 50 पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ठार झाले आणि 7 जणांना ओलीस अफगाणिस्तानने सोडले. काही दिवसांनी मध्यस्थी करत हा तणाव कमी केला. आता पुन्हा एकदा मध्यरात्री पाकिस्तानने मोठा हल्ला अफगाणिस्तानवर केला. अफगाणिस्तानातील खोस्त प्रांतात पाकिस्तानी लष्कराच्या कारवाईमुळे सीमेवर प्रचंड तणाव वाढला आहे. पाकिस्तानने पुन्हा अफगाणिस्तानवर बॉम्बहल्ला केला. हा हवाई हल्ला अशावेळी केला, ज्यावेळी लोक आपल्या घरात शांत झोपले होते.
नेहमीप्रमाणे पाकिस्तानने अफगाणिस्तान सैन्याच्या चौक्यांना टार्गेट न करता घरात झोपलेल्या लोकांना टार्गेट करत घरांवर बॉम्ब टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर हा हल्ला रात्री 12 च्या दरम्यान करण्यात आला. अफगाणिस्तानचे प्रवक्ते जबीहुल्लाह यांनी हल्ल्याबद्दल माहिती देताना सांगितले की, पाकिस्तानचे हवाई हल्ले रात्री 12 वाजताच्या सुमारास झाले. यामध्ये 9 मुलांसह 10 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात काही नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे.
खोस्त आणि कुनार-पाक्तिका सारख्या भागात हल्ले करण्यात आले. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले. पाकिस्तानी सैन्याने एका स्थानिक नागरिकाच्या घरावर बॉम्बहल्ला केला. काही दिवसांपूर्वीच वाढलेला तणाव कमी झाल्याचे
पाकिस्तान
अफगाणिस्तान सीमेवर बघायला मिळाले. मात्र, आता पुन्हा एकदा तणाव वाढल्याचे दिसत आहे. पाकिस्तान कुरापती करत आहे. अफगाणिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर पाकच्या सैन्याची स्थिती खराब झाली होती.
सौदी अरेबिया आणि इराणने दोन्ही देशांना शांत राहण्याचे आवाहन केले होते.
आता पुन्हा एकदा पाकिस्तानकडून अफगाणिस्तावर मोठा हल्ला करण्यात आला. अफगाणिस्तान या हल्ल्याला कशाप्रकारे उत्तरे देतो हे पाहण्यासारखे ठरेल. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात हवाई हल्ला केला होता, त्यानंतर तीन अफगाण क्रिकेटपटू मारले गेले होते. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर देखील अलर्ट मोडवर आहे.