

नागरिकांचा मोठा सहभाग
पिंपरी – निगडी लोकमान्य टिळक चौक ते आकुर्डी श्री खंडोबा मंदिर चौक दरम्यानच्या सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुमित जाधव सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपा काटे यांच्या नेतृत्वात बजाज ऑटो गेटजवळ घंटानाद आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनानंतर स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता ननावरे यांना निवेदन सादर करण्यात आले.
सदर आंदोलन पिंपरी चिंचवड शहरात लक्षवेधी ठरले असून, रस्त्यांच्या दयनीय अवस्थेविरुद्ध नागरिकांच्या रोषाला वाचा फोडणारा ठरले आहे.