



महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाचा धार्मिक दृष्ट्या महत्वाचा असणारा गणपूजा उत्सव कडेपठार गडावर मध्यरात्री अत्यंत धार्मिक विधी मध्ये साजरा करण्यात आला.
पौराणिक काळात महादेवाने मनी आणि मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी भूतलावर म्हणजेच जेजुरीच्या जयाद्री डोंगर रांगेतील कडेपठार येथे मार्तंड भैरवाच्या म्हणजेच खंडोबाच्या रूपाने अवतार घेतला.
यावेळी कडेपठार येथे देव गणांनी मार्तंड भैरवाची भंडारा व फुलांनी पूजा केली. या पौराणिक काळापासून ते आत्ता पर्यंत आषाढ शुद्ध प्रतिपदेला कडेपठार मंदिरात देवाची भंडाराने पूजा केली जात आहे.
मंगळवार दिनांक 25 रोजी मध्यरात्री कडेपठार मंदिरात खंडोबा देवाची मानाच्या पूजा झाल्या. हजारो भाविकांनी देवाला भंडार अर्पण केला. या भंडाराच्या राशीवर फुलांची पूजा करण्यात आली.
मध्यरात्री गडावर छबिना ,तसेच वाघ्या मुरुळी व स्थानिक लोक कलावंतांनी देवाचा जागर केला. पहाटे भंडारा चां प्रसाद वाटून गणपूजा उत्सवाची सांगता झाली.अशी माहिती पुजारी वर्गाचे गणेश आगलावे,रामोशी समाजाचे मानकरी माऊली खोमणे तसेच सेवेकरी शैलेश राऊत यांनी दिली.
या सोहळ्यासाठी ग्रामस्थ,भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.