


जेजुरी वार्ताहर दिनांक 2 महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरी गडावर मानाच्या शिखर काठ्यांची देव भेट सोहळा संपन्न झाला. मानाच्या शिखर काठ्यांची देव भेट होताच हजारो भाविकांनी अतिशय जल्लोषात भंडारा ची उधळण करीत येळकोट येळकोट जयमल्हार मल्हारचा जयघोष केला.
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या वर्षाकाठी दहा यात्रा भरतात. यापैकी माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त होणारी शिखर काठ्याची देव भेटीला धार्मिक व ऐतिहासिक महत्व आहे. संगमनेर येथील होलम राजा, बारामती तालुक्यातील सुपे व इंदूर येथील होळकर शिखर काठ्या या मानाच्या शिखर काठ्या असून याबरोबरच राज्याच्या विविध भागातून पन्नास हून अधिक प्रासादिक काठ्या या सोहळ्यासाठी जेजुरी गडावर आणल्या जातात .
अनेक पिढ्यांपासून देव भेटीचा सोहळा होत असून पूर्वी सर्व शिखर काठ्या एकत्रित पणे खंडोबा मंदिराला टेकवून देव भेट केली जात असे मात्र अनेकदा काही मांनकऱ्यानी आधीच शिखर काठी टेकवून वाद निर्माण होवून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर प्रत्येक यात्रेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बारा वर्षांपूर्वी पोलीस, ग्रामस्थ व पत्रकार यांनी मध्यस्थी करून यावर तोडगा काढला. प्रत्येक मानाच्या शिखर काठीसाठी वेगवेगळ्या वेळेत टेकविण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा पासून ही यात्रा शांततेत पार पडत आहे.
माघ पौर्णिमा नंतर दुसऱ्या दिवशी शिखर काठ्यांचा देव भेटीचा सोहळा होतो. सोमवार दिनांक 2 रोजी सुपे येथील खैरे यांच्या मानाच्या शिखर काठीने ऐतिहासिक छत्री मंदिर, मारुती मंदिर, पहिली वेश व सकाळी अकरा वाजता जेजुरी गडावर खैरे, होळकर व प्रासादिक शिखर काठ्यांनी खंडोबा मंदिराला काठ्या टेकवून देव भेट केली यावेळी भाविकांनी भंडारा ची उधळण करीत जल्लोष केला.
दुपारी 1 वाजता संगमनेर येथील मानाची होलम राजाची शिखर काठी कडेपठार पायथ्या जवळून निघाली. ऐतिहासिक छत्री मंदिर, मारुती मंदिर मार्गे साडे तीन वाजता जेजुरी गडावर सोहळा आला, खंडोबा मंदिर मुख्य काठी आणीं प्रासादिक काठ्या टेकवून देव भेटीचा सोहळा संपन्न झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात भंडारा ची उधळण व येळकोट येळकोट जयमल्हार चां जयघोष केला. देव भेटी नंतर संगमनेर काठ्यांतील तरुणांनी जल्लोष करून उत्सवाचा आनंद लुटला.
सुपे काठीचे मानकरी शहाजी खैरे, शरद खैरे, सुरेश खैरे उमेश उपसुंदे, संगमनेर होलम राजा काठीचे मल्हारी मार्तंड होलम भक्त काटकर मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काटे, दिलीप गुंजाळ, संकेत काटे, कृष्णा वरपे, होळकर काठीचे अंकुश भांड, बबन बंयास, सचिन नातू, देविदास बयास, तुषार गोडसे यांचा सन्मान श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्त अड पांडुरंग थोरवे, विश्वास पानसे यांच्या हस्ते करण्यात आला.जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.