


पुण्याचे माजी खासदार, माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी (वय ८१) यांचे आज मंगळवार दि. ६ जाने रोजी पहाटे ३.३० वाजता पुण्यात दीर्घ आजारानंतर दुखःद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, सून, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
श्रद्धांजली सभा शुक्रवार दि. ९ जानेवारी रोजी सायं. ४.३० ते ६.०० या वेळेत पुना क्लब अॅम्पीथिएटर येथे होईल.
सुरेश कलमाडी पुण्यातील सेंट-व्हिनसेंट शाळा आणि पुढे खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अॅकेडमी येथील पदवी शिक्षण पूर्ण करून भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून दाखल झाले. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात ते सहभागी होते.
१९८२ मध्ये ते प्रथम राज्यसभेचे खासदार बनले. त्यानंतर १९८८, १९९४, १९९८ असे ४ वेळा ते राज्यसभेचे खासदार बनले. यासोबतच १९९६, २००४, २००९ मध्ये असे ३ वेळा ते पुणे लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेस खासदार म्हणून विजयी झाले.
१९९५ ते १९९६ पर्यंत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री बनले. या काळात रेल्वेची पुणे डिव्हिजन त्यांनी तयार केली व असंख्य लांबपल्ल्याच्या रेल्वे त्यांनी पुण्याहून सुरु केल्या. संसदेत रेल्वेचे अंदाजपत्रक मांडणारे ते एकमेव रेल्वे राज्यमंत्री होते.
कॉंग्रेस संसदीय पक्षाचे २००३-२००४ या काळात ते खजिनदारही होते. तसेच २००५ नंतर कॉंग्रेस संसदीय पक्षाचे ते सेक्रेटरी बनले.
हवाई उड्डाण, क्रीडा, संस्कृती, पर्यटन, पर्यावरण संरक्षण, कला आणि विज्ञान व तंत्रज्ञान हे त्यांचे आवडीचे व जिव्हाळ्याचे विषय होते. संसदेच्या विविध समित्यांचे सदस्य म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले.
भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे १९९६ पासून तब्बल १६ वर्ष ते अध्यक्ष होते. तसेच एशियन अॅथलेटिक्स असोसिएशनचे ते २००० पासून अध्यक्ष होते. याआधी १९८७ पासून अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष होते. २००८ मध्ये पुण्यात राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा आणि २०१० मध्ये नवी दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे त्यांनी भव्यतेने यशस्वी आयोजन केले. याशिवाय पुणे, बँगलोर, मणिपूर, पंजाब, हैदराबाद, गोहत्ती आणि झारखंड येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन आणि २००३ मध्ये अॅफ्रो-एशियन गेम्स यांचे त्यांनी यशस्वी आयोजन केले. देशात त्यांनी अॅथलेटिक्स क्रीडा संस्कृती रुजवली आणि हजारो तरुण खेळाडू पुढे आणण्यात मोलाचे योगदान दिले.
पुणे शहराचा विकास हा त्यांचा ध्यास होता. बालेवाडी-म्हाळुंगे येथील श्री. शिवछत्रपती क्रीडानगरीची उभारणी, पुण्याला आय. टी. सिटी बनविणे याबरोबरच विद्येचे माहेरघर व सांस्कृतिक राजधानी असणारे पुणे उद्योगनगरी, क्रीडानगरी, आय. टी. बी.टी. सिटी, उद्याननगरी, पर्यटननगरी, ऑटो हब आणि महोत्सवांचे शहर बनविण्यात त्यांनी फार मोठे योगदान दिले. ‘अॅडव्हेंटेज पुणे’ सारख्या आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करून पुण्यात फार मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आणण्यात त्यांनी फार मोठे योगदान दिले. तसेच पुण्यात मेट्रो प्रकल्प व्हावा यासाठी सन २००४ पासून २०१३ पर्यंत अथक प्रयत्न केले.
१९८९ मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना पुणे फेस्टिवल हा भव्य सांस्कृतिक महोत्सव त्यांनी सुरु केला. १९८३ मध्ये देशातील पहिली पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सुरु केली. यंदा त्यास ३९ वर्ष पूर्ण झाली असून त्यांनी सुरु केलेला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा दिमाखात २४ वे वर्ष साजरे करीत आहे.
पुण्याला त्यांनी आंतरराष्ट्रीय नकाशावर लिहिले. तसेच पुणे हा ‘ब्रँड’ विविध उपक्रमांतून त्यांनी जगभर नेला. प्रशस्त सिमेंटचे रस्ते, सुशोभीत चौक, सिंक्रोनाईज्ड सिग्नल सिस्टीम, पुरेशा दाबाने शुद्ध पाणीपुरवठा, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, कचरा व सांडपाणी विल्हेवाट, उद्याने व नाट्यगृहांमध्ये भर, जैव-विविध्य उद्यानांचे संवर्धन, टेकड्यांचे संरक्षण, जॉगिंग ट्रॅक व व्यायामशाळा, सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये भर, बससेवेत सुधारणा, विमानतळ व रेल्वे स्टेशनचे विस्तारीकरण व आधुनिकीकरण, गरिबांसाठी चांगली आरोग्य सेवा, सुरक्षित पुणे अशा प्रत्येक बाबतीत बारकाईने लक्ष देऊन त्यांनी पुण्याच्या विकासाला दिशा आणि गती दिली. पुण्याच्या विकासासाठी २००८ मध्ये त्यांनी केंद्र सरकार कडून तब्बल २५०० कोटी रुपये विकासनिधी मिळविला. यासोबतच पुणे हे धार्मिक सलोख्याचे शहर राहील याची त्यांनी सदैव काळजी घेतली. या सर्वातूनच सन १९९२ पासून त्यांनी पुण्याच्या विकासाचा सुवर्णकाळ निर्माण केला.