
महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुचर्चित ठाकरे बंधुंनी एकत्र येण्याच्या सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. दोघे बंधु एकत्र आल्यास राज्यातील राजकारण बदलेल अशी चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. ठाकरे बंधुंनी यावेळी कधी नव्हे ते एकत्र येण्यासाठी ठाम पावले टाकली आहेत. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येण्याच्या राज्यातील जनतेच्या आशा कधी नव्हे इतक्या वाढल्या आहेत. मात्र, राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यात त्यांच्या पक्षाची दुसरी फळी अडथळा ठरण्याची शक्यता आहे. ‘माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय’, असे म्हणत शिवसेना सोडली होती. आता राज ठाकरे यांनी महाराष्ट्र हितासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी समेट करण्याची तयारी दाखवली असताना दोन्ही नेत्यांभोवतीचे हेच ‘बडवे’च सर्वात मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे. कारण राज आणि उद्धव एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली असताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे.
मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या अटीचा उल्लेख करताना, त्यांनी भाजपला धोका दिला, आता पवारांनाही देतील, असे सांगत मनसेने त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा, अशा शंका उपस्थित केल्या. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसेच्या मशिदीच्या भोंग्या विरोधातील आंदोलनावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हजार गुन्हे दाखल झाल्याचे सांगत जुना वाद उकरुन काढला होता. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी, महाराष्ट्रद्रोही कोण हे राज ठाकरे यांना कळणार नसले तर त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग सुरु करावा लागेल, असा टोला लगावला होता. यावरून दोन्ही एकत्र येण्यास दुसऱ्या फळीतील नेत्यांचा विरोध आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.
महाराष्ट्र हित आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील क्षुल्लक भांडणे बाजुला सारुन एकत्र येण्याचे सूतोवाच केले होते. त्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद देताना भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत तडजोडी चालणार नाहीत, अशी अट घातली होती. परंतु, ही अटही उद्धव ठाकरे यांनी मागे घेतली होती. ठाकरे गटाकडून काही तासांमध्ये राज ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्यासाठी कोणतीही अट नाही, असा खुलासा केला होता. हा खुलासा ठाकरे गटाने आणखी एक पाऊल पुढे टाकल्याचे बोलले जात आहे. परंतु, मनसेच्या नेत्यांकडून वारंवार जुन्या राजकारणाचा संदर्भ देत पालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मनसेला गुंतवून ठेवण्याचा नवा डाव तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचा सर्वाधिक मोठा फटका भाजपला बसू शकतो. हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यास मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मराठी मतांचे ध्रुवीकरण होऊन भाजपच्या जागा कमी होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध भूमिका घेतली आहे. कुणीही मतभेद विसरुन एकत्र येत असतील तर त्यामध्ये काहीही वाईट नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. या चर्चा माध्यमांमध्ये आहेत. घाई करु नका, थोडी वाट पाहा. हे दोघे एकत्र आले तर आम्ही त्याचे स्वागत करु, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.