
नुमवि वाद्यपथकाने केलेले पारंपरिक वाद्यांचा गजर… आकर्षक फुलांनी सजविलेले शारदा गजानन मंदिर. शारदा गणपतीने परिधान केलेले देखणे भरजरी वस्त्र… गणपती बाप्पा मोरया चा गजर अशा उत्साही वातावरणात शारदा गजाननाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तब्बल १३२ किलो वजनाचा केक कापून असंख्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा झाला.
अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाच्या प्रासादिक मूर्तीचा वाढदिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, अखिल मंडई मंडळाचे सुरज थोरात यांच्या हस्ते यावेळी केक कापण्यात आला. मंडळाचे सचिव विश्वास भोर, विश्वस्त देविदास बहिरट, विकी खन्ना, नुमवि वाद्यपथकाचे यज्ञेश मुंडलिक, विनोद माने, गौरव नरे, श्रीपाद कुलकर्णी गुरुजी, अविनाश कुलकर्णी गुरुजी यावेळी उपस्थित होते.