
तालुक्याचे लागले लक्ष
भिगवण : एकेकाळी कधीही तक्रार न करणारे गाव म्हणून परिचित असणाऱ्या तक्रारवाडी गावात बदलत्या राजकीय घडामोडीमुळे व तरुणांनी राजकारणात लक्ष घातल्यामुळे हे गाव पुणे जिल्ह्यात तक्रारीचे केंद्रबिंदू म्हणून परिचित झाले.१९५२ सालापासून या ग्रामपंचायतीवर स्वर्गीय माजी खासदार शंकरराव पाटील माजी आमदार स्वर्गीय राजेंद्रकुमार घोलप व त्यानंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे वर्चस्व होते. 2020 साली गावातील सर्वपक्षीय तरुणांनी एकत्र येऊन या गावात सत्ता परिवर्तन केले होते. परंतु सरपंच निवडीच्या वेळेस अंतर्गत मतभेद होऊन सदस्य पळवा पळवी प्रकरण होऊन या ग्रामपंचायतीवर सतीश वाघ यांच्या रूपाने राष्ट्रवादीचा झेंडा फडकला होता. त्यानंतर दोन वर्षांनी सतीश वाघ यांनी राजीनामा दिल्याने सरपंच निवडीसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावुन या ग्रामपंचायतवर मणिषा प्रशांत वाघ यांची निवड करून आपले वर्चस्व सिद्ध केले होते. मनीषा वाघ यांच्या सरपंच पदाच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर त्यांना समर्थन देणाऱ्या सदस्यांनी त्यांची साथ सोडली व विरोधी चार सदस्याशी हातमिळवणी करून त्यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर केला. त्यानंतर न्यायालयीन लढाई सुरू झाली . या लढाईत मनीषा वाघ यांच्यावरील अविश्वासाचा ठराव जिल्हाधिकारी यांनी कायम करून सोमवार ( ता.२७) रोजी सरपंच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने या ग्रामपंचायतवर भारतीय जनता पार्टीचे कमल फुलणार की राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी वाजणार का राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे घड्याळ टिक टिक करणार याकडे संपूर्ण तालुकासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.