
पिंपरी : तळवडे येथील डाऊन टाऊन हॉटेलच्या मागे अमरजित जेधे यांची बांधकाम साईट असलेल्या मोकळ्या जागेत दोघांचा खून झाल्याची घटना बुधवारी (दि.२५) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. अनैतिक संबंधातून दुहेरी खून झाल्याचे समोर आले आहे.
मंगला सुरज टेंभरे (वय ३०, रा. अमरावती) आणि जगन्नाथ पुंडलीक सरोदे (वय ५५, रा. अकोला) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दत्तात्रय लक्ष्मण सावळे (वय ४९, रा. चिखली) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड पोलिसांना डायल ११२ वरून रात्री तीनच्या सुमारास माहिती मिळाली कि, तळवडे येथे दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत. त्यानुसार देहूरोडचे रात्रगस्त अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मयत मंगला टेंभरे यांचा पती सुरज टेंभरे यांनी पोलिसांना सांगितले कि, मंगला व सरोदे हे रात्री दारू पित बसले होते.
रात्री दोनच्या सुमारास ठेकेदार सावळे यानेच मला माहिती दिली की दोघे अर्धनग्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यावर दोघांचा दगडाने ठेचून खून केल्याचे स्पष्ट झाले.
प्रकरणातील सर्व शक्यता लक्षात घेत पोलिसांनी आरोपी सावळे याला अटक केली. तो मुळगावी पळून जात होता. सावळे आणि सरोदे या दोघांचे मयत महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यातून हा खून झाल्याचे समोर आले आहे.
या दुहेरी खूनाचा छडा लावून आरोपीला अटक करण्याची कामगिरी देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, सहा पोलीस निरीक्षक जोहेब शेख, पोलीस अंमलदार किरण खेडकर, सुरेश ढवळे, केतन कानगुडे, अमोल माने, पंकज भदाने यांनी केली आहे.