
पुणे : सामाजिक आणि धार्मिक हक्कांच्या लढ्यामुळे राज्यभरात ओळख निर्माण करणाऱ्या तृप्ती देसाई यांच्या पुढील भूमिकेकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून महिलांच्या हक्कांसाठी आक्रमक आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाई या येत्या काळात थेट राजकारणात सक्रिय होणार का, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
गेल्या काही वर्षांपासून सामाजिक प्रश्न, महिला सबलीकरण, समान हक्क आणि धार्मिक स्थळांवरील प्रवेश या मुद्द्यांवर तृप्ती देसाई सातत्याने आघाडीवर राहिल्या आहेत. त्यांच्या आंदोलनांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवरही लक्ष वेधले आहे. त्यामुळेच “आंदोलनातून निवडणुकीपर्यंत” असा प्रवास त्या करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय पक्षांकडून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याचीही चर्चा आहे. मात्र, याबाबत तृप्ती देसाई यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. “माझी लढाई ही सत्तेसाठी नाही, तर हक्कांसाठी आहे,” असे त्या यापूर्वी अनेकदा स्पष्ट करत आल्या आहेत.
राजकीय विश्लेषकांच्या मते, सामाजिक आंदोलनातून आलेल्या नेतृत्वाला जनतेचा थेट पाठिंबा मिळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तृप्ती देसाई यांनी जर राजकारणात प्रवेश केला, तर त्या एखाद्या पक्षासाठी ‘गेम चेंजर’ ठरू शकतात. विशेषतः महिला मतदार आणि तरुण वर्गात त्यांची स्वतंत्र ओळख आहे.
दरम्यान, तृप्ती देसाई यांच्या पुढील भूमिकेबाबत उत्सुकता कायम असून, त्या राजकीय मैदानात उतरणार की सामाजिक चळवळीच्या माध्यमातूनच आपली लढाई पुढे नेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.