


▪️जिल्हा माहिती अधिकारी या गटात यावर्षी पासून पुरस्कार, पहिल्या पुरस्काराने पुणे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील सन्मानित
कोल्हापूर , दि. 8 :
मराठी पत्रकारितेचे आद्य प्रवर्तक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, फलटण यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा ‘दर्पण’ पुरस्कार पुणे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांना महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावर्षीपासून शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वैशिष्ट्यपूर्ण व प्रभावी लेखन करणाऱ्या अधिकाऱ्याला ‘दर्पण’ पुरस्काराने सन्मानित करण्याची विशेष बाब महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने घोषित केली होती. या नव्या उपक्रमातील पहिला पुरस्कार पुणे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांना जाहीर करण्यात आला होता. मंगळवारी (दि. ६) हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात जांभेकर पोंभुर्ले–देवळवाडी येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारकातील ‘दर्पण सभागृहात’ राज्यस्तरीय पत्रकार दिन व ‘दर्पण’ पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या समारंभात राज्यातील ज्येष्ठ व गुणवंत पत्रकार तसेच पत्रकारितेशी संबंधित विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी पत्रकारितेचे लोकशाहीतील स्थान अधोरेखित केले. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजाला योग्य दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य ती पार पाडते, असे त्यांनी सांगितले. मराठी पत्रकारितेचे आद्य प्रणेते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मभूमीबद्दल कॉलेज जीवनापासून आपल्याला विशेष आकर्षण होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार त्यांच्या जन्मभूमीत आपल्या हस्ते प्रदान होत असल्याचा विशेष आनंद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच ‘दर्पण’ पुरस्कार हा पत्रकारितेतील सर्वोच्च सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले.
याचवेळी ना. प्रा. राम शिंदे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावातील स्मारक प्रकल्पासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून मदत देण्याची घोषणा केली. ग्रामपंचायत व पत्रकार कल्याण निधीने यासंदर्भात तातडीने पाठपुरावा करावा, असेही त्यांनी सूचित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी पोंभुर्ले हे गाव महाराष्ट्रातील पत्रकारांची पंढरी व्हावी, या भावनेतून स्मारक उभारण्यात आल्याचे सांगितले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पत्रकारिता, संशोधन व विद्वत्तेतील कार्य आजही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास माजी आमदार प्रमोद जठार, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, सरपंच प्रियांका धावडे, सुधाकर जांभेकर यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील पुरस्कारप्राप्त पत्रकार, पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सन २०२५ च्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये पुण्याचे ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे, नांदेडच्या दै. प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे, मसूर (जि. सातारा) येथील ‘गुंफण’ दिवाळी अंकाचे संपादक बसवेश्वर चेणगे, सातार्यातील ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, श्रीरामपूरच्या दै. स्नेहप्रकाशचे संपादक प्रकाश कुलथे, अहिल्यानगरच्या दै. नगर टाइम्सचे कार्यकारी संपादक श्रीराम जोशी, यवतमाळच्या दै. सकाळचे अनिल काळबांडे, कोल्हापूर येथील मँगो एफ.एम.चे केंद्रप्रमुख आशिष कदम आणि पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचा समावेश होता. सिंधुदुर्गमधील दै. लोकमतचे विजय पालकर यांचा पुरस्कार त्यांच्या पत्नी सौ. श्वेता पालकर यांनी स्वीकारला.