
तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात कार्यरत असलेले महसूल अधिकारी सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडावर आहेत. नुकतीच देलवडी येथील गावकामगार तलाठी यांच्यावर ACB ची कारवाई झाली असून, अजून किती महसूल विभागाचे कर्मचारी ACB च्या गळाला लागणार अशी चर्चा सध्या परिसरात रंगत आहे.
या भागात केडगाव, बोरीपार्धी, वाखारी, खोर, यवत, देऊळगाव गाडा, भांडगाव, वाळकी, राहू, पिंपळगाव, देलवडी या गावातून रात्रंदिवस मुरूम, माती, खडी अशा स्वरूपाचे उत्खनन चालू असून, यामध्ये शासनाचा कोटी रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. तसेच या सजामधील तलाठी व मंडल अधिकारी यांनी संगणमताने आर्थिक देवाणघेवाण करून आपले हात पिवळे केले आहेत. हे उत्खनन जोमात चालू असून, महसूल अधिकारी म्हणतात ‘तुमचे चालू द्या फक्त आमच्याकडे लक्ष द्या’ असे चित्र सध्या दौंड तालुक्यात पहावयास मिळत आहे.
सर्वसामान्य जनता व शेतकरी वर्ग यांच्याकडून शासकीय कामासाठी बिनधास्तपणे पैशाचे मागणी करताना हे अधिकारी कधीच मागे पुढे पाहत नाही, यामुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक झळ बसत आहे. आधीच डबघाईला आलेला शेतकरी या महसूल अधिकाऱ्यांमुळे देशोधडीला लागला आहे. सध्या नागरिक हे एसीबीकडे न घाबरता तक्रार करीत आहेत. दौंड तालुक्यामध्ये अनेक विभागात ही अशी कारवाई होणे गरजेचे आहे. एसीबीच्या वतीने असे आवाहन करण्यात आले आहे की, अशा काही तक्रारी प्राप्त झाल्यास कुणाचीही हयगय केली जाणार नाही. नागरिकांनी बिनधास्तपणे अशा तक्रारी कराव्यात.