दौंडच्या यवत मध्ये वारकऱ्यांसाठी एक टन पिठलं आणि एक लाख भाकरी ची मेजवानी…

Photo of author

By Sandhya

यवत मध्ये वारकऱ्यांसाठी एक टन पिठलं आणि एक लाख भाकरी बेत ..

यवत – जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज सोमवारी यवत मुक्कामी येत आहे.यानिमित्ताने आज सकाळपासूनच यवत परिसरातील घरोघरी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरी बनविण्यासाठी लगबग सुरू होती.
पालखी श्री काळभैरवनाथ मंदिर येथे विसाव्यासाठी आल्यानंतर यवत ग्रामस्थांच्या वतीने ग्रामीण भागातील वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरीच्या महाप्रसादाचे वाटप केले जाते. गेल्या अनेक दशकांची ही परंपरा आहे. यंदा देखील यवतकरांनी ही परंपरा अखंडपणे जपली आहे. यवतमधील श्री काळभैरवनाथ मंदिर येथे जवळपास एक हजार किलोपेक्षा अधिक पिठलं तयार करण्यासाठी आज सकाळपासूनच लगबग सुरू होती.
पालखी सोहळ्यात सहभागी होणारे वारकरी बहुतांश महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकरीच असतात, त्यामुळे या वारकऱ्यांना या पिठलं भाकरीचे वेध लागलेले असतात. याची तयारी आज सकाळपासून यवतकरांनी केली
याच ठिकाणी यवत ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांना पिठलं भाकरीच्या महाप्रसादाचे वाटप केलं जातं. यवत येथील प्रसिद्ध पिठलं भाकरीचा आस्वाद घेण्यासाठी पोलीस प्रशासन, सरकारी अधिकारी व कर्मचारी यांसह नागरिकांमध्ये आतुरता असते.
विशेष म्हणजे गावातील प्रत्येक रहिवासी आपल्या परीने पाच – दहा भाकरी पासून १०० भाकरी पर्यंत मंदिरात आणून देतात. तर श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने मंदिर परिसरात ३०० किलो पिठाच्या भाकरी बनविण्यात येत असतात.गावातील प्रत्येक नागरिकांच्या घरी देखील भाकरी बनवून पालखी येण्यापूर्वी मंदिरात देण्यात येतात. याला अनेक वर्षांची परंपरा आहे.परंपरेनुसार या ठिकाणी यवत ग्रामस्थ मोठ्या भक्ती भावाने आणि प्रेमाने पिठलं भाकरी बनविण्यासाठी आणि महाप्रसाद वाटप करण्यासाठी तयारी करतात.

Leave a Comment

You cannot copy content of this page