धनकवडीमध्ये मध्यरात्रीची दहशत! वाहनांची तोडफोड करणारे ‘आम्ही भाई’ टोळीचे गुन्हेगार जेरबंद

Photo of author

By Sandhya


धनकवडी परिसरात मध्यरात्री दहशतीचा खेळ मांडत “आम्ही धनकवडीचे भाई आहोत” अशी आरोळी ठोकत वाहनांची तोडफोड करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा छडा लावत सहकारनगर पोलिसांनी अत्यंत शिताफीने मोठी कारवाई केली आहे. या घटनेमुळे हादरलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दि. २३ जुलैच्या रात्री, केशव कॉम्प्लेक्स परिसरात काही अनोळखी तरुणांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा लाकडी बांबू व दगडांच्या सहाय्याने फोडत परिसरात अक्षरशः धिंगाणा घातला. “आमच्या नादाला लागू नका, नडाल तर सोडणार नाही” असे म्हणत त्यांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं. या घटनेमुळे अनेक वाहनांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले.

याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानातील विविध गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिस अंमलदार अमोल पवार यांना खात्रीशीर माहिती मिळाली की या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार रोहित आढाव आपल्या साथीदारासह नवले ब्रिजजवळ येणार आहे.

सहकारनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सागर पाटील व त्यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत नवले ब्रिज परिसरात सापळा रचला. रोहित आढाव (वय २१, रा. किरकटवाडी) व सुधीर सावंत (वय १९, रा. नांदेड फाटा) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, यामध्ये त्यांचे आणखी तीन अल्पवयीन साथीदार सहभागी असल्याचे उघड झाले.

तपासात पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली सुमारे ३०,००० रुपये किंमतीची दुचाकी जप्त केली असून, सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

ही यशस्वी कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलींद मोहीते, सहा. पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपासात सपोटि सागर पाटील, बापू खुटवड, अमोल पवार, किरण कांबळे, प्रदीप रेणुसे, अमित पदमाळे, महेश भगत, आकाश कीर्तीकर, मारोती नलवाड, बजरंग पवार, सागर सुतकर, योगेश ढोले व खंडू शिंदे यांचा मोलाचा सहभाग होता.

Leave a Comment

You cannot copy content of this page