धायरीतील ‘श्री ज्वेलर्स’कडून कोट्यवधींची फसवणूक; महिलांना फ्लॅट आणि सोने देण्याचे आमिष

Photo of author

By Sandhya

पुणे – धायरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून उघड होत असलेल्या एका मोठ्या आर्थिक फसवणुकीने संपूर्ण पुणे हादरले आहे. ‘श्री ज्वेलर्स’ या सराफा दुकानाचे मालक कृष्णा दहिवळ याच्यावर हजारो महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. फ्लॅट व सोनं देण्याचं आमिष दाखवून तसेच भिशी (चिट फंड) योजनांद्वारे अनेक नागरिकांकडून पैसे गोळा करण्यात आले.

पीडित महिलांनी सांगितले की, दुकानाने विश्वास संपादन करून त्यांच्याकडून पैसे घेतले आणि त्याबदल्यात न संपणाऱ्या आश्वासनांशिवाय काहीच दिले नाही. आतापर्यंत २ ते २.५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक अंदाज असून, तक्रारींची संख्या वाढतच आहे.

१२ वर्षांचा जुना संबंध, पण विश्वासघात!

या सराफाकडे गुंतवणूक करणाऱ्यांपैकी अनेकांचे दहा ते बारा वर्षांपासून संबंध होते. त्यामुळे त्यांनी कोणतीही शंका न घेता आपल्या आयुष्यभराची कमाई त्याच्याकडे जमा केली. त्यामुळे जेव्हा फसवणुकीचे वास्तव समोर आले, तेव्हा दुकानासमोर महिलांचा आक्रोश उसळला. काही महिला रडत, ओरडत आपली कहाणी सांगताना भावनांवर ताबा ठेवू शकत नव्हत्या.

पोलीस टाळाटाळ करत राहिले, आमदाराच्या हस्तक्षेपानेच तक्रार दाखल

पीडितांनी सांगितले की, पोलिसांकडे गेले असता तक्रार दाखल करण्यास सुरुवातीला टाळाटाळ करण्यात आली. फसवणुकीची गंभीरता लक्षात न घेता पोलिसांनी विलंब केला. मात्र, स्थानिक आमदाराच्या हस्तक्षेपानंतरच पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली.

बनावट दरोड्याचा उलगडा – आणि दुर्लक्षित इशारा

या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे, काही महिन्यापूर्वी याच दुकानात झालेला दरोडा. सुरुवातीला हा प्रकार गंभीर मानला गेला होता, मात्र पोलिस तपासात हे उघड झाले की हा दरोडा बनावट होता आणि दुकान मालक कृष्णा दहिवळच्या सांगण्यावरूनच तो घडवून आणला गेला होता.

त्याला त्या घटनेनंतर अटक झाली, परंतु तो लगेचच जामिनावर बाहेर आला. अनेकांनी पोलिसांवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “जर त्यावेळी पोलिसांनी खोलवर चौकशी केली असती, तर आज ही कोट्यवधींची फसवणूक टळली असती आणि आमचं सोने, पैसे वाचले असते.”

परिसरात संतापाचं वातावरण, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

या प्रकरणामुळे धायरी आणि आजूबाजूच्या परिसरात तीव्र संतापाचं वातावरण आहे. नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक – सगळेच हतबल झाले असून, त्यांनी प्रशासनाकडे आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page