
बारामती, दि.१६: ‘नक्शा’ कार्यक्रमांतर्गत नगरपालिका हद्दीतील माहे मार्च २०२५ मध्ये सर्वे ऑफ इंडियाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या ड्रोन सर्वेक्षणाची ओआरआय (ऑर्थो रेक्टिफाईड इमेज) प्राप्त झाली आहे; त्यानुसार नगरपालिका हद्दीतील बारामती, तांदुळवाडी, रुई व जळोची येथे ड्रोन सर्वेक्षण करुन नगरपालिका हद्दीचे नगर भूमापनाचे काम १७ जुलै पासून करण्यात येणार आहे, अशी माहिती भूमी अभिलेख उप अधीक्षक संजय धोंगडे यांनी दिली आहे.
नागरी स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रातील मूळ व विस्तारीत क्षेत्रामधील जमिनींचे भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) आधारित सर्वेक्षण व भूमापन करण्याबाबत नक्शा हा कार्यक्रम केंद्र शासनाकडून एक वर्षाच्या प्रायोगिक तत्त्वावर बारामती येथे पथदर्शी स्वरुपात राबविण्यात येत आहे. याअंतर्गत नगरपालिका हद्दीतील नगर भुमापन करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी १४ जुलै रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. याकामी उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी तसेच मोनार्च एजन्सी नगरपालिका प्रतिनिधी मिळकतींला प्रत्यक्ष भेट देऊन ग्राऊंड ट्रुथिंग करणार असून त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन श्री. धोंगडे यांनी केले आहे.
नक्शा प्रकल्पाचा नागरिकांना होणारा लाभ: या सर्वेक्षणामुळे धारक अधिकार अभिलेखाचे जीआयएस आधारीत नकाशे व मिळकत पत्रिका मिळण्यासोबतच मिळकतींचा नकाशा तयार होऊन त्यांचे क्षेत्र व अक्षांश-रेखांश सहित सीमा निश्चित होणार आहे. त्यामुळे त्यांच्या नागरी हक्कांचे संरक्षण होईल. मिळकत पत्रिकेच्या स्वरुपात अधिकार अभिलेख तयार झाल्यामुळे मिळकतीवर कर्ज घेणेची सुविधा उपलब्ध होईल तसेच मिळकतीबाबतचे न्यायालयीन दावे कमी होण्यास मदत होईल, असेही श्री.धोंगडे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.