


आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. मात्र यंदा प्रथमच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाचं कामकाज विरोधी पक्षनेत्यांशिवाय चालणार आहे. विधिमंडळाच्या कामकाज पत्रिकेमध्ये विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात कुठलाही उल्लेख नाही. दरम्यान विधान परिषदेमध्ये काँग्रेसकडून सतेज पाटील आणि विधानसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्र देण्यात आलेल आहे.
सात दिवस चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनातून राज्यातील जनतेला खास करून शेतकऱ्यांना, तसंच विदर्भातील जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. आज पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या मांडल्या जातील. शासकीय कामकाज होईल. त्यानंतर शोकप्रस्ताव मांडला जाईल. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले जाईल. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकांचा प्रभाव पुरवणी मागण्यांवरती पडणार का?, पुरवणी मागण्यासंदर्भात काही नवीन घोषणा होते का? हे पाहणं महत्वाचं राहील.