





कथ्थक,भरतनाट्यम, कुचीपुडी आणि ओडिसी नृत्य परंपरेचा अनोखा आविष्कार
सुरेल, लयबद्ध आणि तालबद्ध नृत्यास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे, दि. ७ : सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्यावतीने आयोजित नुपूर महोत्सवाचे मुख्य सचिव कार्यालयाचे अवर सचिव विठ्ठल भास्कर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन शुभारंभ करण्यात आला.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित महोत्सवास महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, सांस्कृतिक संचालनालयाच्या पुणे कार्यालयाच्या अधीक्षक जान्हवी जानकर, कार्यक्रम समन्वयक गौरी लोंढे, कला रसिक आदी उपस्थित होते.
या महोत्सवात कथ्थक,भरतनाट्यम, कुचीपुडी आणि ओडिसी नृत्य परंपरेचा अनोखा आविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे. या महोत्सवामध्ये दिल्ली, कोलकाता, जबलपूर, पुणे, मुंबई आणि नाशिक येथील दिग्गज कलाकारांचा सहभागी झाले आहेत.
पहिल्या दिवशीच कृत्य नरसिंग राणा यांनी सितास्वयंवर (ओडिसी), सलोनी देशपांडे ग्रुपच्यावतीने दशावतार, वेदांती भागवत ग्रुपच्यावतीने चतुरंग, राजलक्ष्मी भास्करने कृष्णरंग, राजश्री धोंगडे ग्रुपच्या नृत्यधारा, अथर्व चौधरी भरतनाट्यम, माया कुलश्रेष्ठ ग्रुपच्यावतीने मीरा (बॅले) सादर करण्यात आलेल्या सुरेल, लयबद्ध,
तालबद्ध नृत्यास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रविवार, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी डॉ. सुमुखी अथणी ग्रुप, शालिनी खरे ग्रुप, वेदांती भागवत ग्रुप, राजश्री धोंगडे ग्रुप, गौरेश शेटकर ग्रुप, रसिका गुमास्ते, सुभिता मुरली ग्रुपच्यावतीने नृत्य सादर करण्यात येणार आहे. रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून या कार्यक्रमास अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.