
टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात
निलेश बनसोडे पंढरपूर(प्रतिनिधी):-पंढरपूर शहरातील अंबाबाई पटांगणा नजिक असलेल्या नव्या पुलावर भैरवनाथ ट्रान्सपोर्टचा हिंदुस्तान पेट्रोलियमच्या टिपरने एका व्यक्तीला चीरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला सदरील मृत व्यक्तीही पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथील असून त्यांच्यासोबत असलेली मुलगी जखमी झाल्याचे समजते. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
पंढरपूर शहरातून गेल्या अनेक दिवसापासून जड वाहतूक सुरू असून या वाहतुकीवर आळा बसावा यासाठी अनेकांनी शर्तीचे प्रयत्न केले परंतु अशी वाहतूक थांबता थांबेना अखेर आज पंढरपूरच्या चंद्रभागा नदीवरील पुलावर हिंदुस्तान पेट्रोलचा टिपरने एकाला चिरडल्याने नागरिकांत संताप व्यक्त होऊ लागला. सदरची मृत व्यक्ती ही नारायण कोंडीबा बुरांडे रा.तारापूर येथील असून त्याच्यासोबत असलेली मुलगी जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समजते.
पंढरपुरातून आपले काम करून तारापूर गावाकडे निघालेल्या व्यक्तीला नवीन पुलावर पेट्रोलचा टिपर क्र. एम एच १३/ईपी ९४५५ ने चिरडल्या नंतर परिसरातील नागरिकांनी अपघात ठिकाणी मोठी गर्दी केली होती. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटना स्थळी पोहचून त्यांनी विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. या ठिकाणी स्पीड ब्रेकर असावे अशी मागणी महर्षी वाल्मीक संघाच्या वतीने काही दिवसापूर्वी करण्यात आली होती. परंतु स्पिड ब्रेकर नसल्यामुळेच हा अपघात झाल्याची चर्चा घटनास्थळी होताना दिसत होती.