

▪️ कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभहस्ते १११ विद्यार्थिनींना मोफत सायकल वितरण
ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाण्यासाठी अनेक विद्यार्थिनींना दररोज लांबचा प्रवास करावा लागतो. या प्रवासामुळे त्यांची शालेय हजेरी कमी होते तसेच शिक्षणात अडथळे निर्माण होतात. या समस्येवर मात करून मुलींच्या शिक्षणात गती यावी, शाळेत नियमित उपस्थिती वाढावी आणि प्रवासाचा त्रास कमी व्हावा, यासाठी पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती इंदापूर यांच्या वतीने ‘सायकल बँक’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभहस्ते इंदापूर येथे संपन्न झाला. यावेळी इंदापूर तालुक्यातील पाचवी ते आठवी वर्गातील १११ विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. सायकल मिळाल्याने विद्यार्थिनींमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण होते. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू या उपक्रमाचे महत्व अधोरेखित करीत होते.
कृषी मंत्री श्री. भरणे यांनी यावेळी सांगितले की, “पुणे जिल्हा परिषद शिक्षणाच्या क्षेत्रात सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. ‘सायकल बँक’ ही योजना मुलींच्या शैक्षणिक प्रवासाला नवी दिशा देणारी आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शाळेत जाणे सोपे होईल, प्रवासाचा त्रास कमी होईल आणि नियमित हजेरीत वाढ होईल. शिक्षणाच्या प्रवाहात कोणतीही मुलगी मागे राहू नये, यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल. पुढेही जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाईल.”
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, पंचायत समिती इंदापूरचे पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभिनव उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मुलींच्या शैक्षणिक संधींना नवी दिशा मिळणार असून, सायकल ही केवळ प्रवासाचे साधन न राहता शिक्षणाची गती वाढविणारे माध्यम ठरणार आहे.