


शिक्षकच निभावताहेत मुख्याध्यापकाची भूमिका,
समस्यांच्या विळख्यातून पालिकेच्या शाळा मुक्त होणार का?
पुणे तेथे काय?उणे ह्या म्हणीचा परिपाठ करणाऱ्या व विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील येरवडा भागातील कै.महादेव दगडू जाधव प्राथमिक शाळेत गेल्या तीन ते चार वर्षापासून मुख्याध्यापकच नसल्याने प्रभारी म्हणून येथील शिक्षकांनाच मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची वेळ येत असल्याने समस्यांच्या विळख्यातून पालिकेच्या शाळा मुक्त होणार का?हा मुख्य प्रश्न आता पालकांनाच नाही तर जनतेला देखील सतावत आहे.
आज शहराबरोबरच इतर भागातील समाजातील गरजूवंत व गोरगरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणाचा लाभ मिळावा या उद्देशाने पालिका शिक्षण मंडळाच्या वतीने शहराच्या विविध भागात कोट्यवधी रुपये खर्च करून पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आल्याने आज गरीब कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी या उपक्रमाचा लाभ मिळत असला तरी पण मोफत शिक्षणाबरोबरच त्यांच्यावर शिक्षकांनी संस्कार घडविणे देखील तेवढे आवश्यक असताना मात्र पालिकेच्या शाळांनी याउलट चित्र दिसत असून दोन दिवसापूर्वीच या भागातील नवी खडकी परिसरातील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात कचऱ्याच्या साम्राज्य बरोबर घाणीच्या साम्राज्याने वेढा घातल्याचा प्रकार समोर आला असतानाच शिक्षकांच्या आशीर्वादाने अथवा दुर्लक्षितपणामुळे चक्क अल्पवयीन विद्यार्थी वर्गातच गुटखा खाऊन भिंतीवर अथवा खिडक्यांवर थुंकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येऊन शाळेच्या अनेक भिंती ह्या गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगल्याचे निदर्शनास आल्याने परिसरात या चर्चेने खळबळ उडाली असल्यामुळे झालेल्या प्रकारामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच या शाळेलगतच पालिकेच्या वतीने अंदाजे १९५५साली जवळपास सत्तर वर्षापूर्वी नवी खडकी येरवडा परिसरात लहान मुलांच्या शिक्षणासाठी पालिका शिक्षण मंडळाच्या वतीने १०९मुलांची व ७२मुलींची प्राथमिक शाळा उभारण्यात आली असून येथील प्राथमिक शाळेत जवळपास दिडशे गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे.परिसरातील मुलांना शिक्षणाचा लाभ मिळावा या उद्देशानेच तीन मजली इमारत असलेल्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यासाठी जवळपास एकवीस वर्ग बांधण्यात आले आहेत.पण असलेली ही प्राथमिक शाळेत ही इतर पालिकेच्या शाळाप्रमाणेच शिक्षकांनाच काय?पण पालकांना देखील समस्यांचा पाढा वाचल्याशिवाय पर्याय राहत नाही.विशेष करून तीन मजली असलेल्या या शाळेला गेल्या तीन ते चार वर्षापासून मुख्याध्यापकच नसल्याने येथील शिक्षकांनाच प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम पाहण्याची वेळ येत असल्याने संबंधित शिक्षकांना मुलांच्या शिक्षणाबरोबरच मुख्याध्यापकांचे नाईलाजास्तव काम करण्याची वेळ येत असल्याने हा सर्व कारभार सांभाळताना शिक्षकांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे मुख्याध्यापकांचे पद सांभाळायचे की,विद्यार्थ्यांना शिकवायचे हा गंभीर प्रश्न शिक्षकासमोर उभा राहत आहे.यासंदर्भात अधिकाऱ्याकडे याबाबत वारवार तक्रार करून देखील शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेचे मुख्य समस्या सोडविण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करून एकप्रकारे शिक्षकांच्या मागणीला केराची टोपली दाखवली असल्याचे येथील घटनेमुळे दिसून येत आहे.
यापाठोपाठ मुख्याध्यापकाचा प्रश्न भेडसावत असताना व मुख्य अडचण मार्गी लागली नसतानाच तोच शाळेला आणखी एका समस्याने ग्रासले असून गेल्या अनेक वर्षापासून शाळेला शिपाई देखील नसल्याने शाळेतील साफसफाईपासून ते शाळेचे कागदपत्रापर्यंत असलेले शिपायाचे सर्व कामकाज हे रखवालदार असलेल्या व्यक्यातिलाच करण्याची वेळ येत असल्याने खरोखर संबंधित ह्या पालिकेच्या शाळा आहेत का?ह्या समस्येने आता डोके खाजविण्याची वेळ आली आहे.आज शहरातील बहुतांश प्रमाणात पालिकेच्या शाळांनी मुख्याध्यापकच नसल्याने अनेक शाळांनी हे काम शिक्षकांनाच पाहावे लागत आहे.याचे ताजे उदाहरण सांगायचे झाल्यास विश्रांतवाडी येथील शाळेबरोबरच लोहगाव येथील दादाची पडळ येथील देखील पालिकेच्या शाळेची हिच अवस्था असल्यामुळे शिक्षकांसह शिक्षण अधिकारी खरोखरच विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यास सक्षम आहेत का?हा गंभीर प्रश्नाने अनेकांना सतावले आहे.विशेष करून येथील शाळेत तळमजल्यापासून ते तिसऱ्या मजल्यापर्यंत शाळेच्या आवारात कचऱ्यासह घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात साचल्याने येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शाळेच्या टेरेसची पाहणी केली असता या ठिकाणी टेरेसवर वॉटर प्रूफ् न केल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात असलेले छत गळत असल्याने शाळेच्या भिंती ओल्या चिंब होत असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांना देखील अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येत आहे.याबरोबरच पावसाच्या पाण्यामुळे ओलसर झालेल्या शाळेच्या भिंतीचे रंग उडून त्यावरील रंगाचे टवके उडाल्याचे दिसून येत आहे.विशेष करून शाळा भरतेवेळी शाळेला पटांगणच नसल्याने नाईलाजाने शिक्षकांना प्रार्थना ही व्हरांड्यात भरविण्याची वेळ येऊन विद्यार्थ्यांना यावेळी अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येत आहे.याबरोबरच विद्यार्थी संख्या कमी असल्याने पहिल्या मजल्यावरील सर्व वर्ग रिकामे असून पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग हे दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर भरत आहेत.यासह टेरेसवर देखील दरवाजे तुटलेल्या अवस्थेत अस्ताव्यस्त अवस्थेत पडून पाण्याच्या टाक्या देखील तुटलेल्या अवस्थेत पडल्याचे निदर्शनास येऊन पालिका शिक्षण मंडळ अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.आज अनेक कुटुंबातील मुले ही शिक्षण घेत असताना क्रीडा क्षेत्रात देखील तरबेज होऊन भविष्यात देशाचे नाव उज्वल होण्यासाठी उत्कृष्ट खेळाडू या हेतूने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.मात्र या ठिकाणी विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रीडांगणच उपलब्ध नसल्याने येथील विद्यार्थी खेळापासून वंचित राहत आहे.त्यामुळे भविष्यात अशा शाळांमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुलाने क्रीडा क्षेत्रात भरारी घेऊन देशाचे नाव उज्वल करण्याचे पाहिलेले स्वप्नांचा भंग होऊन ते स्वप्नच राहून जात आहे.जर शहरातील पालिकेच्या शाळांची अशा प्रकारची दुरवस्था असेल तर ग्रामीण भागातील शाळांची खरी परिस्थिती काय ?असेल हे सांगणे कठीण आहे.
आज शहराकडे विद्येचे माहेरघर म्हणून संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशात ही ओळख असताना दुसरीकडे मात्र पालिकेच्या शाळांची अशी अवस्था असेल तर पालिका शिक्षण मंडळ विभाग गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यास सक्षम आहेत का?या प्रश्नाचे उत्तर गेल्या अनेक वर्षापासून शाळांच्या झालेल्या बिकट अवस्थेमुळे अनुत्तरीतच असल्याचे स्पष्ट होत आहे.