

पुणे – आज पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास पीसीएस चौक, धानोरे फाटा परिसरातील पत्र्याच्या बनावटीच्या दुकानांना अचानक भीषण आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि परिसरात घबराट पसरली.
घटनेची माहिती मिळताच आळंदी नगरपरिषद अग्निशमन दल, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चऱ्होली (चोवीसावाडी) अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. तिन्ही अग्निशमन दलांच्या जवानांनी संयुक्त कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवले.
या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक माहितीमध्ये स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आळंदी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आगीच्या कारणांचा तपास सुरू आहे.