पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धा १९ ते २३ जानेवारीदरम्यान

Photo of author

By Sandhya

पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा तयार कराव्यात – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, दि. ७: पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धा देशाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. स्पर्धेसाठीचे रस्ते, आरोग्य व्यवस्था आदी पायाभूत सुविधा आणि सुरक्षितता या बाबी आंतराष्ट्रीय स्पर्धेच्या निकषानुसार आणि दर्जेदार तयार कराव्यात. या कामांना सर्व संबंधित यंत्रणांनी सर्वाधिक महत्त्व द्यावे; गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले. ही स्पर्धा १९ ते २३ जानेवारीदरम्यान होणार आहे.

पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेत संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील (दूरदृश्यप्रणालीद्वारे), पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल आदी उपस्थित होते.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, पुणे ग्रँड चॅलेंज टूर ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा पुण्यात प्रथमच होत असून अभिमानाची बाब आहे. ही आपल्यासाठी आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी दर १५ दिवसांनी बैठक घेऊन कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. आपल्याला भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धा भरविण्याच्यादृष्टीने ही सायकलिंग स्पर्धा महत्त्वाची आहे, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, स्पर्धेसाठीचे रस्ते आंतरराष्ट्रीय सायकलिंग असोसिएशनच्या (युसीआय) मानकांनुसार तयार करायचे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी या रस्त्यांची कामे करुन घेताना सर्वत्र एकसमानता राहील याकडे लक्ष द्यावे. त्रयस्थ संस्था नेमून केलेल्या कामांचे वेळोवेळी परिक्षण करण्यात यावे. रस्त्यांचे काम पुढील आठवड्यापासूनच सुरू होईल याची दक्षता घ्यावी.

सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय) यांनी स्पर्धेच्या मार्गावरील अपघात होऊ शकतात अशी ठिकाणे निश्चित करुन दिली असून तेथे आवश्यक त्या उपाययोजना पोलीस तसेच संबंधित विभागांनी कराव्यात. मार्गावर दुचाकी, अन्य वाहने, व्यक्ती, प्राणी येऊ शकतील अशी ठिकाणे शोधून स्पर्धेपूर्वी ती प्रवेशासाठी बंद करण्याच्या सर्व उपाययोजना कराव्यात. आरोग्य विभागाने मार्गावरील शासकीय रुग्णालये अद्ययावत करावीत तसेच जवळची खासगी रुग्णालये अत्यावश्यक सुविधेसाठी निश्चित करावीत. आपत्तकालीन परिस्थिती, अपघातप्रसंगी सावधानता म्हणून हेलिकॉप्टर सेवा घेण्याची तयारी असावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

पोलीस विभागाने बंदोबस्त आराखडा तयार करून नेमण्यात येणारे मनुष्यबळाचे प्रशिक्षण तसेच रंगीत तालिम सुरू करावी. सर्वच विभागांनी संबंधित स्पर्धेच्या अनुषंगाने नेमण्यात येणाऱ्या मनुष्यबळाची स्पर्धा संपेपर्यंत बदली करु नये. याबाबत शासनालाही विनंती करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, १९ ते २३ जानेवारीदरम्यान ही स्पर्धा होणार असून स्पर्धेला आंतरराष्ट्रीय सायकलिंग असोसिएशनची मान्यता मिळाली आहे. त्यांच्या संकेतस्थळावरील दैनंदिनीमध्ये या स्पर्धेची नोंद घेण्यात आली असून त्यावर आपल्या स्पर्धेच्या संकेतस्थळाची लिंक देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत ६ ते ७ देशांनी आपला सहभाग नोंदविण्याच्यादृष्टीने संपर्क केला असून जवळपास ५० देश सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

ऑलिम्पिक स्पर्धा भरविण्याच्या दावेदारीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग, जलतरण, जिम्नॅस्टिक्स, ॲथलेटिक्स स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करणे आवश्यक असून त्यादृष्टीने या स्पर्धेचे महत्त्व आहे. ही स्पर्धा पुढे दरवर्षी भरविण्याच्यादृष्टीने यशस्वी करणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी डॉ. म्हसे यांनीही विविध सूचना केल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी तसेच पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यांच्या तयारीच्या अनुषंगाने माहिती दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले यांनी आरोग्य सुविधेविषयक सादरीकरण केले.

Leave a Comment

You cannot copy content of this page