
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री,केंद्रीय मंत्री, आंतरराष्ट्रीय खेळाडू यांच्या उपस्थितीत होणार संपन्न
भारताच्या सायकलिंग क्षेत्रात नवा इतिहास घडवणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या (UCI लेव्हल २.२ स्टेज रेस) लोगो आणि जर्सी अनावरणाचा भव्य समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे आणि राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत द वेस्टिन हॉटेल, कोरेगाव पार्क येथे बुधवार , २९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता पार पडणार आहे.
या समारंभात स्पर्धेची अधिकृत घोषणा करण्यात येणार असून, तो भारताच्या सायकलिंग इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाला क्रीडा सचिवांसह भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा, तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी पंकज सिंग, मनिंदर पाल सिंग, मनजीत सिंग जी.के., आणि ओंकार सिंह हे मान्यवर उपस्थित राहतील.
आशियाई सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष व UCI चे उपाध्यक्ष दातो अमरजीत सिंग गिल (मलेशिया) आणि UCI व्यवस्थापन समिती सदस्या युआन युआन (चीन) यांचीही उपस्थिती अपेक्षित आहे.
सुमारे १८० मिनिटे चालणाऱ्या या कार्यक्रमाला प्रायोजक, मीडिया प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संघ आणि सायकलिंगप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. त्यांनी सांगितले की पुणे ग्रँड टूर ही भारतातील पहिली जागतिक दर्जाची मल्टीस्टेज सायकलिंग स्पर्धा ठरणार असून, महाराष्ट्रातील निसर्गरम्य मार्गांवर होणाऱ्या या स्पर्धेतून राज्याची क्रीडा प्रतिष्ठा नव्या उंचीवर पोहोचेल.