

संभाजी ब्रिगेडने लावले ‘राजमाता जिजाऊ पुणे जंक्शन’चे पोस्टर्स
पुणे – पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आज संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुणे स्टेशन आणि परिसरात “राजमाता जिजाऊ पुणे जंक्शन” असे उल्लेख असलेले पोस्टर्स लावून या मागणीला नव्याने चालना दिली आहे.
पुणे रेल्वे स्थानकाचे नाव बदलून राजमाता जिजाऊ यांच्या नावावर ठेवावे, अशी मागणी याआधीही संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली होती. त्यासाठी त्यांनी आंदोलन देखील छेडले होते. आता पोस्टर्सच्या माध्यमातून ही मागणी अधिक ठामपणे समोर आणली जात आहे.
रेल्वे स्थानकाच्या नावावरून गेल्या काही दिवसापासुन विविध संघटना व राजकीय पक्षांत तणावाचे वातावरण आहे. काहींनी ऐतिहासिक व्यक्तींच्या नावाने नामकरण करण्याची मागणी केली आहे, तर काही संघटनांनी याला विरोध दर्शवला आहे.संभाजी ब्रिगेडच्या या कृतीनंतर स्थानिक प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे पुन्हा एकदा नामांतराच्या मुद्द्यावरून पुण्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.