पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

Photo of author

By Sandhya

पुणे दि. १४: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवन येथे आयोजित बैठकीत पुणे विभागातील कोविड-19 साथीच्या अनुषंगाने आढावा घेतला. लक्षणे सौम्य असली तरी वृद्ध तसेच सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक असून आरोग्य विभाग, महानगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे कोल्हापूर मनपा आयुक्त के. मंजुलक्ष्मी, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. कंदेवाड यांनी कोविड-19 च्या अनुषंगाने सादरीकरण केले. सद्यस्थितीत तपासणीमध्ये ओमीक्रॉनचे जेएन, एक्सएफजी व जीएफ7-9 हे उपप्रकार आढळून येत आहेत. या प्रकारामुळे ताप, खोकला, घसा दुखणे असे सौम्य आजार होतात. फक्त रक्तशर्करा, कर्करोग आदी सहव्याधी कमी असलेले, रोग प्रतिकार शक्ती कमी असलेले नागरीक आदींना थोडा धोका जास्त आहे. अशांनी गर्दीत जाणे टाळावे. हात स्वच्छ धुणे, मास्क वापरणे तसेच सुरक्षित अंतर ठेवावे. श्वसनदाह वाढल्यास त्वरीत जवळच्या दवाखान्यात जाऊन तपासणी व इलाज करावा, असे यावेळी सांगण्यात आले.

सहायक संचालक डॉ. प्रशांत वाडीकर, विभागातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यावेळी होते. त्यांना कोविड व वारीबाबत काळजी घेण्याच्या सूचना व सर्व रुग्णालये कोविडच्या संभाव्य साथीसाठी सज्ज ठेवण्याच्या व सतत माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page