



पुणे – शहरातील सोमवार पेठेतील समर्थ पोलीस स्टेशनजवळ काल (१० जुलै) मध्यरात्रीच्या सुमारास एक गंभीर घटना घडली. रस्त्याच्या कडेला असलेले एक जुने आणि मोठे झाड अचानक रस्त्यावर कोसळले. हे झाड एका चारचाकी वाहनावर पडल्याने वाहनाचा चालक गाडीत अडकून राहिला.
हादरलेल्या नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. झाड सावधगिरीने बाजूला करण्यात आले आणि वाहनात अडकलेल्या इसमाची सुखरूप सुटका करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे झाडांची तपासणी करून धोकादायक झाडे वेळीच हटवावीत, अशी मागणी केली आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या वेळीच दाखल होण्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली.