पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अनोखी मानवंदना

Photo of author

By Sandhya

श्री साई मित्र मंडळात
यंदा लेकी कारभारी

  • केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निर्णय
  • ⁠अध्यक्षपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत यंदा ‘महिलाराज’

पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचे यंदाचे ३०० वे वर्ष आहे. विविध कार्यक्रमातून, उपक्रमातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. एकीकडे गणेशोत्सवाला यंदा महाराष्ट्र सरकारने राज्यउत्सव म्हणून मान्यता द्यायचा निर्णय घेतला असताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या साई मित्र मंडळाने यंदाच्यावर्षी मंडळाचा सर्व कारभाराची दोरी महिलांच्या हातात देण्याचा औचित्यपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून यंदा महिलांच्या हाती कारभार देत मंडळ वेरुळ येथील कैलास मंदीर साकारणार आहे. या देखाव्याच्या कामाचे कळसपूजन चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले, यावेळी केंद्रीय मोहोळ यांनी ही घोषणा केली.

कोथरूड परिसरातील केंद्रीय मंत्री मोहोळ संस्थापक असलेले श्री साई मित्र मंडळ हे भव्य व देखण्या प्रतिकृती गणेशोत्सवात सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. यंदाच्यावर्षी ३० वा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी, अशीच भव्य, आकर्षक आणि कलात्मक प्रतिकृती सादर करताना मंडळाची धुरा महिलांच्या हातात त्यांनी दिली आहे. यंदाच्या उत्सवाचे सर्व संयोजन महिलाभगिनी करणार आहेत. त्यांना सहाय्यक म्हणून पुरूष कार्यकर्ते काम करणार आहेत.

भारतीय शिल्पकारांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका पाषाणात कैलास लेणीची केलेली निर्मिती हे जगभरासाठी आश्चर्य ठरले आहे. ही लेणी बघण्यासाठी लाखोंच्या संख्येने परदेशी पर्यटक दरवर्षी वेरूळला भेट देतात. या कैलास लेणी संकुलातील ‘कैलास मंदिराची’ प्रतिकृती मंडळाच्यावतीने यंदा करण्यात येणार आहे. या सजावटीच्या कामाच्या कळस पूजनाचा शुभारंभ यावेळी प्रसिद्ध मूर्ती आणि मंदिर अभ्यासक गणेश धालपे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गेल्यावर्षी आयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती मंडळाने केली होती.

याबाबत केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘गणेश मंडळांचा मुख्य कारभार पुरूष मंडळींच्याच हातात असतो. मंडळातील महिला भगिनी काम करतातच, मात्र त्यांना खुले व्यासपीठ मिळत नाही. मात्र हे चित्र बदलायचे असून यंदाचे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे ३०० वे वर्षे आपण साजरे करत आहोत. त्यानिमित्ताने आमच्या मंडळातील महिला भगिनी अनोखी आदरांजली वाहतील. अहिल्यादेवींच्या चरित्रापासून महिला वर्गाल स्फूर्ती मिळावी आणि त्यांचा सार्वजनिक कामातील माताभिगीनींचा आत्मविश्वास, सहभाग वाढवण्यासाठी आम्ही सर्वांनी ही निर्णय घेतला आहे’

Leave a Comment

You cannot copy content of this page