पुण्यातील नॅन्सी होम प्रकल्पाचे बेकायदेशीर बांधकाम :

Photo of author

By Sandhya


विभागीय आयुक्तांनी स्थळभेट देऊन
तातडीने अहवाल सादर करण्याचे
विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचे निर्देश

    पुणे येथील नॅन्सी लेक होम प्रकल्पाला सन-2004 नंतर आतापर्यंत जवळपास 10 वेळा सुधारित मान्यता देण्यात आली असून गाव नकाशा आणि मोजणी नकाशा मध्ये सर्व्हे क्र.08 आणि 09 च्या स्थानांमध्ये फेरबदल केले गेल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त, पुणे यांनी भूमी अभिलेख विभागासह सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन स्थळभेट द्यावी आणि सखोल चौकशी करुन 15 दिवसांच्या आत अहवाल सादर करावा, असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले. आज दिनांक 29 ऑक्टोबर, 2025 रोजी विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली नॅन्सी लेक होम सर्व्हे नं.08, कात्रज, पुणे येथे विकासकाने बेकायदेशीर बांधकाम प्रकल्प केल्यासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली, त्याप्रसंगी हे निर्देश देण्यात आले.

    या प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकारी, पुणे यांनी बिगरशेती आदेशामध्ये 37,973.20 चौ.मी. क्षेत्रफळासाठी बांधकाम परवानगी दिलेली असताना प्रत्यक्षात 60,630.59 चौ.मी. क्षेत्रफळावर बांधकाम करण्यात आले आहे किंवा कसे, वारंवार नकाशात बदल करण्याची कारणे काय आहेत, असे प्रश्न या बैठकीप्रसंगी उपस्थित करण्यात आले. याबाबत संबंधित अधिकारी यांचेकडून समाधानकारक खुलासा होऊ न शकल्याने महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी विभागीय आयुक्त, पुणे यांना यासंदर्भात स्थळभेट देऊन चौकशी करणे आणि 15 दिवसांच्या आत अहवाल देण्याबाबतचे निर्देश दिले. 

    याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (4) श्री.शिवदर्शन साठ्ये, उप सचिव श्री.मोहन काकड, नगरविकास विभागाच्या सह सचिव श्रीमती प्रियांका छापवाले, कार्यकारी अभियंता, पुणे महापालिका श्री.रमेश काकडे, उप अभियंता श्रीमती रुपाली ढगे, सहाय्यक विधि अधिकारी श्री.निलेश बडगुजर, नगर भूमापन अधिकारी, पुणे श्री.बाळासाहेब भोसले बैठकीस उपस्थित होते. 

Leave a Comment

You cannot copy content of this page