
पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, ते वाहतूक विभागाच्या नियंत्रण कक्षात कार्यरत होते. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
शनिवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने गायकवाड घरीच होते. त्यांची पत्नी दौंड येथे गेली होती, तर १२ व १४ वर्षांची मुले शाळेत गेली होती. दुपारी पत्नीने अनेक वेळा फोन केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. शाळा सुटल्यावर मुले घरी आली असता घर बंद असल्याचे लक्षात आले. त्यांनी ही माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.
विमानतळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि दरवाजा उघडून पाहिले असता गायकवाड हे घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
गायकवाड यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. पोलीस विभागात अत्यंत शांत आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, त्यांच्या मृत्यूमुळे सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आत्महत्येचं कारण जाणून घेण्यासाठी त्यांचा मोबाईल आणि इतर वैयक्तिक माहितीची तपासणी करण्यात येत आहे.