


पुरंदर तालुक्यात निसर्गाचा प्रकोप पुन्हा पाहायला मिळाला. गुरुवारी (दि. १५) दुपारी दोनच्या सुमारास पुरंदर किल्ल्याच्या दक्षिणबाजूच्या पायथ्याकडील काळदरी आणि बहिरवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. केवळ अर्ध्या तासाच्या या तुफान पावसाने परिसरात अक्षरशः थैमान घातले.
विशेष म्हणजे, या जोरदार पावसामुळे अवघ्या १५ मिनिटांतच परिसरात महापुराची स्थिती निर्माण झाली. बहिरवाडी ते काळदरी दरम्यान असलेले सर्व सिमेंट बंधारे तुडुंब भरून वाहू लागले. या अचानक आलेल्या पुरात अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिके पाण्याखाली गेली असून, माती आणि कचरा साचल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्याचा तडाखाही तितकाच भयंकर होता. यामुळे येथील अंकुश भिकोबा कारकर, रावसाहेब नानासाहेब कारकर, बबन बाबुराव कोकरे, शंकर बाबुराव कोकरे आणि विठ्ठल भागुजी कोकरे यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. घरांवरील छप्परं उडून गेली, तर काही घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. यासोबतच, अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यांचेही मोठे नुकसान झाले असून, जनावरांना सुरक्षित ठेवण्याची समस्या निर्माण झाली आहे.
अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे काळदरी आणि बहिरवाडी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामस्थांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई देण्याची मागणी केली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.