

राष्ट्रवादीच्या कैलास इंगळेंनीही धरले ‘कमळ’; भाजपची ‘स्वबळा’ची घोषणा अन् उमेदवारांची यादी जाहीर
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी बुधवारी (ता. २१) पुरंदर तालुक्यात प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या. आमदार विजय शिवतारे यांचे खंदे समर्थक व शिवसेनेचे पुरंदर तालुकाप्रमुख हरिभाऊ लोळे यांनी माजी आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली असून, त्यांना वीर-भिवडी या जिल्हा परिषद गटाची उमेदवारी देण्यात आली आहे.
हरिभाऊ लोळे हे शिवतारे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते, तसेच त्यांच्या पत्नी नलिनी लोळे यांनी शिवसेनेकडून पंचायत समितीच्या सभापती पदाची धुराही सांभाळली होती. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या मुद्द्यांमुळे मी भाजपची विचारधारा स्वीकारली आहे,” असे लोळे यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादीला खिंडार; अजय इंगळे यांना उमेदवारी
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कैलास इंगळे यांनीही पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याचे बक्षीस म्हणून त्यांचे चिरंजीव अजय इंगळे यांना बेलसर-माळशिरस जिल्हा परिषद गटातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
युतीच्या चर्चेला पूर्णविराम; १०९ अर्ज दाखल
माजी आमदार संजय जगताप यांनी पत्रकार परिषदेत भाजपची ‘स्वबळा’ची घोषणा केली. यामुळे तालुक्यातील सेना-भाजप युतीच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. तालुक्यात ४ जिल्हा परिषद गट आणि ८ पंचायत समिती गण असून, भाजपाकडून एकूण १०९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
भाजपचे अधिकृत उमेदवार खालीलप्रमाणे:
१. वीर – भिवडी विभाग:
जिल्हा परिषद गट: हरिभाऊ लोळे
वीर गण: सुधीर धुमाळ, निलेश जाधव
भिवडी गण: सायली मनोज शिंदे, संगिता चंद्रकांत बोरकर
२. दिवे – गराडे विभाग:
जिल्हा परिषद गट: दिव्या गंगाराम जगदाळे
दिवे गण: सुनील कुंजीर, देविदास कामथे
गराडे गण: ललिता दिलीप कटके, रेखा संभाजी फडतरे
३. बेलसर – माळशिरस विभाग:
जिल्हा परिषद गट: अजय कैलास इंगळे
बेलसर गण: कैलास जगताप, तुषार झुरंगे
माळशिरस गण: माऊली यादव
४. निरा – कोळविहीरे विभाग:
जिल्हा परिषद गट: सीमा संदीप धायगुडे
निरा शिवतक्रार गण: वंदना बाळासो भोसले
कोळविहीरे गण: सीमा भाग्यवान म्हस्के
याप्रसंगी गंगाराम जगदाळे, गिरीष जगताप यांसह सर्व उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी काळाणे यांनी केले तर संदीप फडतरे यांनी आभार मानले. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी अंतिम चित्र स्पष्ट होईल, असेही जगताप यांनी नमूद केले.