
सासवड- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुरंदर तालुक्यातील १३ शाखांमधील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांमार्फत सन २०२२ – २३ मध्ये वितरित झालेल्या खरीप आणि रब्बी हंगामातील पिककर्जाच्या व्याजापोटी राज्य शासनाकडून डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून ३ टक्के व्याज सवलतीचे
एकूण ३ कोटी ४७ लाख ३५ हजार ७०८ रुपये मंजूर झाले आहेत. ही रक्कम आठवडाभरात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक व पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय चंदूकाका जगताप यांनी दिली.
जिल्हा बँकेच्या माध्यमातून यापूर्वी ३ लाखांपर्यंतचे पिककर्ज शून्य टक्के व्याजाने मिळत होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून केंद्र शासनाच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांनी भरलेल्या व्याजाची ६ टक्के रक्कम त्यांना परत केली जात आहे. यात केंद्र आणि राज्य शासनाचा प्रत्येकी ३ टक्के वाटा आहे. यातील राज्य सरकारच्या डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून ३ टक्के व्याज सवलतीचे सन २०२२-२३ मध्ये पुरंदरमधील १८ हजार १३० शेतकऱ्यांना एकूण ३ कोटी ४७ लाख ३५ हजार ७०८ रुपये मंजूर झाले आहेत. या आठवड्यात जमा होईल, असे माजी आमदार जगताप यांनी सांगितले.
या बैठकीत जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी महेंद्र खैरे, पुरंदरमधील विकास सोसायट्यांचे समन्वयक अनिल उरवणे, बँकेचे वसुली अधिकारी किरण जाधव, विकास अधिकारी जयेश गद्रे, राजन जगताप, आण्णा शिंदे, शरद वणवे, मयूर भुजबळ, पवन दुर्गाडे, मंगेश घोणे, शिरीष जाधव यांच्यासह अनेक अधिकारी, सोसायट्यांचे सचिव उपस्थित होते.