बारामती तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा संपन्न

Photo of author

By Sandhya

२२ क्रीडा प्रकारात विविध गटातील सुमारे ५०० खेळाडूंचा सहभाग-तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले

बारामती, दि. १०: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व बारामती तालुका क्रीडा शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा २०२५-२६ तालुका क्रीडा संकुल बारामती, (माळेगाव) येथे ८ व ९ ऑक्टोबर २०२५ रोजी यशस्वीपणे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये १४, १७,१९ या वयोगटातील सुमारे ५०० खेळाडुंनी सहभाग घेतला. २० पेक्षा जास्त बाबी मध्ये क्रीडा प्रकारातील प्रथम व द्वितीय क्रमांकाचे खेळाडू जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेकरीता पात्र झाले आहेत. सदरील स्पर्धेचे उद्घाटन माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दीपक बापू तावरे यांच्या हस्ते तर सेवा निवृत्त मुख्याध्यापक नागनाथ टेंगल यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.

तालुका क्रीडा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजन

मैदानी क्रीडा स्पर्धा दिमागदार आणि निकोप वातावरणात पार पाडण्याकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी, तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, बारामती तालुका क्रीडा शिक्षक संघटना, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक पंच, क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक, स्वयंसेवक, खेळाडू, स्वयसेवी संस्था आदी घटकांचे सहकार्य लाभले. तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांनी स्वयंनिधीतून क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक, पंच, कार्यरत कर्मचाऱ्यांना ३५ टी शर्ट तर क्रीडा शिक्षक संघटनेच्यावतीने कॅपचे वितरण करण्यात आले. द परफेक्ट अकॅडमी संचालक लक्ष्मण भोसले यांनी २५ स्वयंसेवक उपलब्ध करुन दिले. यावेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार रेखा धनगर यांच्या सह विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. बारामती तालुक्यातील शारीरिक शिक्षण क्षेत्रात काम करत असलेल्या सेवानिवृत्ती क्रीडा शिक्षकांचा याठिकाणी सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्याकरिता या स्पर्धेचे संयोजक राजेंद्र पोमणे, दीपक नलवडे, तसेच बारामती तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खोमणे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले..

श्री. जगन्नाथ लकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी : नवीन क्रीडा शिक्षकांना प्रत्यक्ष मैदानावर स्पर्धा आयोजनाबाबतचा आलेल्या अनुभवाचा आगामी क्रीडा स्पर्धा आयोजनाकरिता लाभ होणार आहे, तसेच तालुक्यातील राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर खेळाडूंचा सहभागाकरिता या स्पर्धा उपयुक्त आहेत.

श्री. महेश चावले, तालुका क्रीडा अधिकारी : बारामती तालुका हा राज्यात क्रीडा क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिला आहे, ही पंरपरा यापुढेही तालुक्यातील खेळाडू पुढे घेवून जाण्याचे काम करेल. स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूवृत्ती वाढीस लागावी, गुणवंत खेळाडुंच्या अंगी असलेल्या विकसित करणे, अधिकाधिक प्रतिभावान खेळाडू घडावेत या उद्देशाने मैदानी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page