
बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दरम्यान आचारसंहिता भंग आणि निवडणूक विषयक कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांनी दिली आहे.
आचारसंहिता पथक प्रमुख तथा अग्निशमन अधिकारी पदमनाभ सुधीर कुल्लरवर यांनी आचारसंहिता भंग झाल्याबाबतची तक्रार बारामती शहर पोलीस स्टेशन येथे केली आहे. यामध्ये निवडणुकीकरीता बारामती नगरपरिषद नवीन इमारत, दुसरा मजला निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या 17 नाव्हेंबर 2025 रोजी विविध उमेदवार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असतांना पत्रकार म्हणून अभिजीत कांबळे, रा. आमराई, ता. बारामती, जि. पुणे यांने दुपारी 2 वाजून 30 ते 3 वाजेदरम्यान कोणतीही पुर्वपरवानगी न घेता निवडणूक प्रक्रियेची गुप्तपणे चित्रीकरण केले. सदरचे चित्रीकरण स्वत:च्या फेसबुक या समाजमाध्यमावर 19 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसारित केले. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात बेकायदेशीरपणे जमाव करुन गोंधळाची स्थिती निर्माण केली; दालनात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी उद्धटपणे वर्तन केले, नामाकंन प्रकियेमध्ये अडथळा निर्माण करुन गोपनीयतेचा भंग केला. उमेदवाराच्या नामाकंन पत्राची छाननी प्रकिया सुरु असतांना 18 नोव्हेंबर 2025 रोजी अडथळा निर्माण केला.
याप्रकरणी श्री. कांबळे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 132,192,174,175,223 तसेच लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 128,125,127(ए), 129 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 च्या कलम 66 (अ), 66 (सी), 66 (ड) आणि 67 या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांनी कळविले आहे.