
एम.पी.डी.ए. कायद्यातील दुरुस्तीनंतर पुणे शहरातील पहिली कारवाई
लोणी काळभोर प्रतिनिधी – पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्याचप्रमाणे पुणे शहरातील जनतेचे रक्षण व्हावे तसेच कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडु नये याकरीता पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशीर मटका जुगार धंदे करणारे, अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालविणारे, पोलीस अभिलेखावरील टोळीतील गुंड, दरोडा, जबरी चोरी तसेच शरीर व मालमत्ते विरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवुन त्यांचे विरुध्द ठोस व परिणामकारक कारवाई करुन त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबतचे आदेश देण्यात आलेले होते.
त्यानुसार लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील बेकायदेशीर मटका जुगार चालविणारा रेकॉर्डवरील सराईत तात्याराव महादेव ससाणे ( वय ५० वर्षे रा. माळीमळा, मारुती मंदिराशेजारी, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे )हा पोलीसांकडुन वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईस न जुमानता सातत्याने बेकायदेशीर मटका जुगार चालवुन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक असलेली कृत्ये करत होता. त्याच्या या कृत्यामुळे गोर गरीब लोकांचे आर्थिक नुकसान होऊन संसार उध्दवस्त होण्यामुळे लोकांचे मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली होती.
त्यादरम्यान एम.पी.डी.ए. कायदयामध्ये दिनांक ०९ जुन २०२५ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार अनुक्रमांक ३४ अन्वयेचे दुरुस्तीनुसार परिमंडळ ५ मधील लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर मटका जुगार चालविणारा तात्याराव महादेव ससाणे यांच्या विरुध्द लोणीकाळभोर पोलीस ठाणेचे मार्फतीने एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव तयार करुन पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कडे पाठविला असता पोलीस आयुक्तांनी त्यास नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे एक वर्षे कालावधीकरीता स्थानबध्द करण्या बाबतचे आदेश पारीत केले आहेत.
ही कारवाई एम.पी.डी.ए. कायदा दुरुस्ती झाल्यानंतर पुणे शहर आयुक्तालयातील परिमंडळ ५ मधील लोणीकाळभोर पोलीस स्टेशनकडून बेकायेदशीर मटका जुगार चालवून सार्वजनिक सुव्यवस्थेस व शांतता भंग करणाऱ्या इसमावर सर्व प्रथम करण्यात आली असुन यापुढेही अशाप्रकारे बेकायदेशीर धंदे करणाऱ्या इसमांवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.
ही कारवाई अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर, डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परि. ०५, पुणे शहर, श्रीमती अनुराधा उदमले, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) स्मिता पाटील, पो.उप निरी उदय काळभोर, पोलीस हवालदार सुनिल नागलोत, तेज भोसले, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे, दिपक सोनवणे, महिला पोलीस अंमलदार योगिता भोसुरे यांनी केली आहे.