
चार तालुक्यांसह पुणे, पिंपरी – चिंचवड पालिकेसाठी महत्वाचे व वरदान ठरलेल्या खेड तालुक्यातील भामा – आसखेड धरणात फक्त
१५ .०९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. परिसरातील नागरिकांसाठी ही चिंतेची बाब आहे.
उन्हाळी व या हंगामातील दुसरे आवर्तन मागील महिन्यातील दि.१० एप्रिल रोजी सुरु करण्यात आले होते. त्यासाठी १ हजार २०० क्यूसेक्स प्रति सेकंद वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याची माहिती धरण प्रशासनाचे अधिकारी निलेश घारे यांनी दिली.
उन्हाळी व पाहिले आवर्तन दि.३ मार्च २५ ते १३ मार्च २५ रोजी दरम्यान सोडण्यात आले होते. त्यावेळी आलेगावपागा पर्यंत सुमारे १८ बंधारे भरले होते, असे घारे यांनी सांगितले. तर दुसरे आवर्तन तब्बल ३३ दिवस १२०० क्यूसेक्सने सोडण्यात आले होते. सदर पाण्यामुळे खेड तालुक्यातील १०, शिरूर मधील ४, हवेली मधील ४ तर, दौंड मधील ६ बंधारे ( एकूण २४ बंधारे ) भरण्यात आले. परंतु त्यानंतर धरणात गतवर्षीच्या तुलनेत सुमारे पाच टक्के पाणीसाठा कमी राहिला.
परंतु गेल्या तीन दिवस पावसाने दमदार हजेरी लावल्याने कित्येक बंधाऱ्यातील पाणी किमान ७ ते८ दिवस वापरले जाणार नाही. त्यामुळे १५ जून पर्यंत पावसाने दडी मारली तरी पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही, असा अंदाज धरण प्रशासनाचे अधिकारी निलेश घारे यांनी व्यक्त केला आहे. यंदा एकूण १२९९ मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली. भामा आसखेड हे ८.१४ टीएमसी क्षमतेचे आहे. उपयुक्त साठा ३२.७६६ दलघमी (१.१६ टीएमसी) आहे. धरणात एकूण पाणीसाठा ४२.२८८ दलघमी(१.६३ टीएमसी) इतका असून धरणसाठा १५.०९ टक्के आहे. तर गतवर्षी २०.१५ इतका होता.
भामा आसखेड हे मातीचे धरण असून ते खेड, शिरूर व दौंड तालुक्यासाठी शेती व पिण्याचे पाणी यासाठी, तर पिंपरी – चिंचवड साठी पिण्याचे पाणी यासाठी वरदान ठरले आहे. यावर्षी ३३ दिवस सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे २४ बंधारे भरले. त्यामुळे सध्या उन्हाची तीव्रता जाणवत असूनही सुमारे महिनाभर पिण्याच्या पाणी योजनेस अडचण येणार नाही.