


पुणे : फुलांचा वर्षाव करीत ढोल-ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपतीची आगमन मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक पद्धतीने पालखीतून ही मिरवणूक काढण्यात आली. मंडळाने यंदा साकारलेल्या मथुरेतील वृंदावनात ‘तुळशीबागेचा महागणपती’ विराजमान झाला.
मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष (१२५ वे) साजरे करत आहे. श्रींची प्राणप्रतिष्ठापना दुपारी १२.१५ वाजता आळंदी देवाची प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ महाराज यांच्या हस्ते झाली. श्रींच्या आगमन सोहळ्याचा शुभारंभ उद्योजक पुनीत बालन यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी उत्सवाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, वसंत नगरकर, परिसरातील व्यापारी वर्ग तसेच मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी १० वाजता गणपतीची पालखीतून मिरवणूक निघाली. मिरवणूक गणपती चौकातून नगरकर चौक, आप्पा बळवंत चौक, बुधवार चौक, समाधान चौक, लक्ष्मी रोड मार्गे पुन्हा गणपती चौक ते उत्सव मंडपात आली. मिरवणुकीत लोणकर बंधूचे नगारा वादन झाले. रुद्रांग व तालगर्जना वाद्यपथकांनी देखील वादन केले.
नितीन पंडित म्हणाले, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मथुरेतील ‘वृंदावन’ या संकल्पनेवर आधारित देखावा सादर केला आहे. तब्बल ८० फूट रुंद, १२० फूट लांब आणि ३५ फूट उंच असा भव्य देखावा असून देखाव्यात १४ फूट उंचीचे ४० खांब, दहा बाय दहा आकाराचे १४ पॅनल आणि सुमारे ३० मोर वृंदावनात विहार करताना साकारले आहेत. राधाकृष्णांचे मंदिर आणि २० फूट लांब, ४० फूट उंच भव्य प्रवेशद्वार या देखाव्याचे प्रमुख आकर्षण आहे. उत्सव काळात अभिषेक, गणेश याग, बृहस्पती याग, सत्यविनायक पूजा आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.