



चिमुकल्या लेकींच्या ओठातून बापाबद्दल उमटल्या निरपेक्ष भावना*
सासवड
प्रतिनिधि-जिवन कड
अनाथांची माई पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन (बालगृह) कुंभारवळण संस्थेत जागतिक पितृदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून लेकीचं बापासोबत असलेले भावनिक नाते रेखाटले आहे. अनाथ आश्रमात लेकींचा सांभाळ करणाऱ्या बापाबद्दल चिमुकल्यांच्या ओठातून निरपेक्ष भावना उमटल्या आहेत.
पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या आकस्मिक निधनांनंतर आईच्या प्रेमापासून पोरक्या झालेल्या अनाथ मुलींना आपल्या लेंकीप्रमाणे जपण्याचं कार्य त्यांचे पाहिले मानसपुत्र दिपक गायकवाड करीत आहेत. सद्या त्यांच्यावर माई नंतर अध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे. त्यांना ४६ वर्षाचा सहवास माईंसोबत काम करण्याचा लाभला आहे. सिंधुताई सपकाळ ह्या ज्या पद्धतीने अनाथ मुलींची काळजी घेत होती, त्यांचा सांभाळ करीत होती, त्यांचं पालन-पोषण आणि संगोपन करण्यासाठी जी धावपळ सुरु असायची तीच धावपळ आता संस्थेचे अध्यक्ष दिपक दादा गायकवाड करीत आहे. आपल्या वरील प्रेमाचं ऋण व्यक्त करण्यासाठी संस्थेतील चिमुकल्या मुलींना स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन फादर डे अर्थात जागतिक पितृदिन उत्साहात साजरा केला. कु. अक्षदाने “दमलेल्या बापाची कहाणी तुला” हे भावनिक गीत सादर करून काळजाला स्पर्श केला. कु. पावनीने बापाची वेदना मांडून आपल्या लेकीसाठी बाप किती कष्ट घेतो यावर प्रकाश टाकला. याच सोबत संस्थेतील अनेक मुलींनी जोरदार सांस्कृतिक सादर करून वडिलांवरील प्रेमाची पावली दिली. काहींनी गीत आणि आपले मनोगत सादर केले. कु. आकांक्षाने दिपक दादांचे एक सुंदर चित्र रेखाटून भेट दिले. तर मुलींनी वेगवेगळे आकर्षक ग्रीटिंग आणि फोटो फ्रेम भेट दिल्या. तसेच सर्वच मुलींनी गुलाबपुष्प भेट देऊन फादर डेच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ममता बाल सदन (बालगृह) संस्थेतील सर्व मुली आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. संस्थेतील चिमुकल्या मुलींनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो अशी भावना, संस्थेचे अध्यक्ष दिपक दादा गायकवाड यांनी व्यक्त करून तुम्ही खूप खूप शिक्षण घेऊन माईंचे स्वप्न पूर्ण करा असे आवाहन केले.
वडिलांसाठी प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी जून महिन्याच्या तिसर्या रविवारी ‘फादर्स डे’ साजरा केला जातो. ‘फादर्स डे’ची मूळ कल्पना पाश्चात्य आहे. ती अमेरिकेतून आली आहे. कल्पना पाश्चात्य असली तरी आज जगभर ‘फादर्स डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. खरे तर बाप आपल्या इथला असो वा परदेशातला; थोड्या फार फरकात सगळीकडे ‘बाप हा बाप’च असतो’
आज अनेक शेतकर्यांची मुले-मुली स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारीपदे भूषवत आहेत. इतरही क्षेत्रात यशस्वी आहेत. खेड्यातला तोच बाप आता आधुनिक बाप म्हणून वावरत आहे. त्याला आज सगळे कळते. मुलगा-मुलगी हा भेद आता तो मानत नाही. त्याची मुलगीसुद्धा आज डॉक्टर, इंजिनिअर अशा उच्चशिक्षणासोबतच क्लास वन, क्लास टू अधिकारी म्हणून विविध क्षेत्रात उच्चपदांवर कार्यरत आहे. एवढे सगळे सांगण्याचा उद्देश एवढाच की आजच्या या स्पर्धात्मक सुपरफास्ट युगात कालचा ‘तो’ शेतकरी बाप आज आधुनिक नवा कोरा ‘स्मार्ट बाप’ झाला आहे, अशी भावना मुलींनी मांडली.