

मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक चिघळत असताना, रांजणगाव गणपती येथे लागलेल्या फलकांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. रांजणगाव बसस्थानक परिसर व महागणपती मंदिराजवळ लावलेल्या फलकांमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय दिलीपराव वळसे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली ठाम भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा मतदारसंघात आपल्या विरोधात तीव्र निषेध होईल, असा इशारा दिला आहे.
सध्या मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असून, मराठा समाजाच्या हक्कासाठी हजारो समाजबांधव तळ ठोकून बसले आहेत. अनेक आमदार-खासदार उपोषणस्थळी हजेरी लावून आपली भूमिका जाहीर करीत आहेत, परंतु काही लोकप्रतिनिधी गप्प बसल्याने त्यांच्या मतदारसंघात असंतोषाची ठिणगी पडू लागली आहे.
रांजणगावातील या फलकामुळे स्थानिक पातळीवरही वातावरण पेटू लागले आहे. आरक्षणाच्या लढ्यात जनतेला आपल्या प्रतिनिधींनी स्पष्ट भूमिका घ्यावी, असे स्पष्ट संकेत समाजातून मिळत आहेत. “जनतेच्या प्रश्नावर मौन धरणाऱ्या नेत्यांना मतदारसंघ माफ करणार नाही,” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहेत.
मराठा आरक्षणावर आता राजकीय नेत्यांची कसोटी लागली असून, रांजणगाव गणपतीत लागलेले फलक हीच त्याची सुरूवात असल्याचे चित्र दिसत आहे.