मराठी भाषेच्या प्रसारासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार

Photo of author

By Sandhya

मुख्यमंत्री यांना निवेदन सादर

मुंबई, १८ जुलै २०२५ : महाराष्ट्राची समृद्ध मराठी भाषा राज्याच्या सीमा ओलांडून देशभर तसेच परदेशात प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी विधान भवनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष मिलिंद महाजन यांनी भेट घेऊन मराठी भाषेच्या प्रसारासंदर्भातील मंडळाची भूमिका आणि पुढील दिशा यावर सविस्तर चर्चा केली.

या बैठकीला उद्योग व मराठी भाषा संवर्धन मंत्री उदय सामंत आणि देवदत्त राजोपाध्ये उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांना यावेळी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने अधिवेशनाचे निमंत्रण आणि निवेदन सादर करण्यात आले.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या पुढाकाराने या विषयावर प्राथमिक बैठकही पार पडली होती. त्यांच्या दालनात झालेल्या या चर्चासत्रास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, मिलिंद महाजन व देवदत्त राजोपाध्ये उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देऊन संपूर्ण बाब अवगत करण्यात आली.

“मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्राबाहेर व देशभर प्रभावीपणे कसा करता येईल?” या विषयावर या बैठकीत सखोल विचारमंथन झाले. बृहन्महाराष्ट्र मंडळाची या कार्यातील सक्रिय भूमिका कशी असू शकेल, यावरही विस्तृत चर्चा झाली.

यानंतर १४ जुलै २०२५ रोजी डॉ. गोऱ्हे यांच्या दालनात मंत्री उदय सामंत यांच्यासोबत विशेष बैठक पार पडली. “मराठी भाषेच्या प्रसारासाठी ठोस आणि परिणामकारक पावले उचलली जातील,” अशी ग्वाही यावेळी मंत्री सामंत यांनी दिली.

Leave a Comment

You cannot copy content of this page