
संघर्षयोद्धा विजयी : महाराष्ट्र सरकारची शिष्टाई सफल, मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा शासन निर्णय
मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारचे, मंत्रिमंडळाचे आभार मानले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपोषण सोडायला यावं, तुमचं आमचं वैर संपलं असे म्हणत जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्यासाठी सरकारपुढे अट ठेवली आहे. तुम्ही या, नका येऊ आमची ही विनंती आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. त्यावर, आपण हे उपोषण आज सोडूया, उपोषण मागे घ्यावे, नंतर आपण मुख्यमंत्र्यासमवेत भेटूया असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप मदत केली, त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आलोय, ह्या मागण्या मान्य करू शकलो असे विखे पाटील यांनी म्हटले. त्यानंतर, मनोज जरांगे पाटील यांनी काही वेळातच विखे पाटील यांच्याहस्ते पाणी पिऊन आपले उपोषण सोडले.
आमचं म्हणणं एवढचं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित दादा आणि आमच्या मराठ्यांमध्ये एक कटुता आहे, ते जर इथं आले तर ती कटुता संपुष्टात येईल पण ते आले नाहीत तर ही कटुता कायम राहिल, असे म्हणत जरांगे पाटील यांनी उपोषण सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना बोलावले होते. मात्र, विखे पाटलांच्या विनंतीनंतर अखेर जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मंत्रिमंडळ समितीचा प्रमुख असल्याने मलाच सर्व अधिकार देण्यात आले आहेत, त्यामुळे माझ्यासह मंत्रिमंडळातील सदस्यही आमच्यासोबत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अधिकार राधाकृष्ण विखे पाटील यांनाच दिले आहेत, त्यामुळे आपण उपोषण सोडावं अशी विनंती असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले. त्यानंतर, मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना विचारत राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते पाणी पिऊन उपोषण सोडले. तसेच, दमानं गाड्या चालवा म्हणत मुंबईतून आता गावाकडं जायचंय, घरी निघायचं असे आवाहनही केले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 5 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची लढाई सुरू केली होती. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची प्रमुख मागणी करत हैदराबाद आणि सातारा गॅझेटचीही मागणी केली होती. यासह, मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची आणि आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या मराठा आंदोलकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व नोकरी देण्याची मागणी केली होती. राज्य शासनाच्यावतीने आज मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर सदस्यांनी आझाद मैदानात जाऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. तसेच, सरकारने आपल्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मराठा आणि कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय काढण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी मागितला आहे. तर इतर मागण्याचे शासन निर्णय जारी केले आहेत. त्यानुसार, अखेर शासनाने हैदराबाद गॅझेट आणि इतर मागण्याचे शासन निर्णय जारी केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले. मुंबईतील आझाद मैदानात मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष केला, गुलालाची उधळण करुन आनंदोत्सव साजरा केल्याचं पाहायला मिळालं.
कुणबी सर्टिफिकेट मिळणार, ओबीसी आरक्षणाला धक्का नाही : देवेंद्र फडणवीस
मला कितीही शिव्या दिल्या, दोष दिले तरी मी सगळ्या समाजासाठी काम करणार. मराठा उपसमितीने एक चांगला तोडगा काढला आणि कायद्याच्या चौकटीत बसेल असा निर्णय घेतला अशी पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी झाल्यामुळे ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना, त्यांच्या रक्तातील सर्वांनाच कुणबी सर्टिफिकेट मिळणार असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची सांगता झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलत होते. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आलं. मनोज जरांगे यांनी केलेल्या आठपैकी सहा मागण्या मान्य झाल्या. त्यामधील हैदराबाद गॅझेट लागू करण्याची प्रमुख मागणी मान्य झाली. त्याचा फायदा मराठवाड्यातील बहुतांश मराठ्यांना होणार आहे.
माझी लेकरं सुखी राहतील
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आलं आहे. मराठा समितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचं सांगितलं आहे. त्यानुसार गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं समितीनं मान्य केलं आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझी लेकरं सुखी राहतील, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांचं कल्याण झाल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा सुवर्णक्षण असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. याआधी विदर्भात आणि खानदेशात आपण नोंदी दिल्या असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.