महात्मा गांधी पुतळ्याची कोयत्याने तोडफोड; सुरज आनंद शुक्ला याला अटक

Photo of author

By Sandhya

पुणे | दिनांक : ७ जुलै २०२५

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची काल (६ जुलै) रात्री कोयत्याने तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुरज आनंद शुक्ला (वय ३४), रा. फुलेनगर, विश्रांतवाडी, पुणे, मूळ गाव चीतईपूर, नवादा, वाराणसी (उत्तर प्रदेश) याला तात्काळ ताब्यात घेतले आहे.

ही घटना रात्री १० वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास घडली. शुक्ला याने कोयता हे धारदार शस्त्र विनापरवाना बाळगले होते आणि पुणे रेल्वे स्टेशनजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर वार करून त्याचे नुकसान केले.

या घटनेनंतर बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता यांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.

या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर २१०/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३२४ (३), शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ (२५), तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (३) सह १३५ अंतर्गत सरकारी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page