
प्रस्तावित स्मारक परिसरातील स्वच्छता आणि सुरक्षितता याबाबत महानगरपालिकेने दक्ष राहण्याच्या दिल्या सूचना
पुणे, दि. १२ जुलै २०२५ :
महात्मा फुले वाडा आणि भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक प्रकल्पाच्या कामकाजाला गती देण्यासाठी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पाशी संबंधित विविध अडचणी, प्रलंबित कामे, महानगरपालिके मार्फत करावयाची कामे, स्मारक समिती च्या अडचणी आणि स्मारकाच्या भविष्यातील आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः कामकाजामध्ये दिरंगाई होऊ नये यासाठी त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आणि पुढील १५ दिवसांत कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले.
बैठकीत डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, मालक आणि भाडेकरू यांचे नुकसान भरपाईचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा. याबाबतचा सकारात्मक प्रस्ताव शासनास सत्वर सादर करावा जेणेकरून स्मारकाचे काम गतीने पुढे नेता येईल. कामकाजाचे वेळापत्रक करून त्यानुसार कालबद्धरित्या काम पूर्ण करावे.प्राप्त निधीचा विनियोग वेळेत करण्यासाठी समिती आणि मनपा ने सक्रिय व्हावे. स्मारक प्रकल्पाचे दैनंदिन व्यवस्थापन अधिक नियोजनबद्ध व्हावे यासाठी पुणे महानगरपालिकेने वाड्यामध्ये माहिती देणारे एक कार्यालय स्थापन करावे. नागरिकांना प्रकल्पाची माहिती मिळावी, तसेच समिती अध्यक्षांसाठी देखिल कार्यालयाची गरज असून, स्मारक परिसरातील मनपाची कार्यालये इतर ठिकाणी स्थलांतरित करावीत. स्मारक परिसराचे सर्वेक्षण कामकाज वेळेवर पूर्ण करावे , असे त्यांनी स्पष्ट केले.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य देशासाठी प्रेरणास्थान असून, त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जतन व्हाव्यात, या उद्देशाने राष्ट्रीय स्मारक उभारणीसंदर्भातील कामकाज मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक हे पुणे शहराचे वैभव ठरावे आणि महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनगौरवाचे जिवंत प्रतिक म्हणून सामन्यांना पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी ठरावे यासाठी आपण सर्वांनी मनापासून काम करण्याच्या सूचना त्यांनी महापालिका व समिती अध्यक्षांना दिल्या. स्मारकाचे कामकाजाला गती देण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या समितीला देखिल सक्षम करणे गरजेचे असून त्यांना महानगरपालिके मार्फत आवश्यक सहकार्य करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्री. ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त अविनाश सपकाळ, उपायुक्त अरविंद माळी, उपयुक्त मालमत्ता वसुंधरा बर्वे, भूसंपादन अधिकारी उपजिल्हाधिकारी श्रीमती श्वेता दारुणकर ,शहर अभियंता प्रशांत वाघमारे व इतर अधिकाऱ्यांसोबत महात्मा फुले वाडा व भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष श्री. निलेश गिरमे हे देखिल उपस्थित होते.