महावितरणला पावसाचा तडाखा; ९२४ खांब जमीनदोस्तसर्व वीज उपकेंद्रांचा वीजपुरवठा पूर्ववत

Photo of author

By Sandhya


 
बारामती- मागील आठवड्यात विशेषत: २५ व २६ मे रोजी महावितरणच्या बारामती मंडलातील ६ उपकेंद्रांना व त्यांतर्गत १० उच्चदाब वाहिन्यांना मान्सून पूर्व पावसाचा सर्वाधिक फटका बसला. लघुदाबाचे ६५७ तर उच्चदाबाचे २६७ असे ९२४ खांब जमीनदोस्त झाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर बहुतांश उपकेंद्रांचा वीजपुरवठा काही तासांतच पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले असून, अद्याप फक्त २११३ बिगरशेती ग्राहकांचा वीजपुरवठा बंद आहे. तो पूर्ववत करण्यासाठी वीज यंत्रणा अहोरात्र झटत आहे. मुख्यालय व परिमंडलातील ‘वॉर रुम’ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
महावितरण बारामती मंडलात पुण्यातील बारामती, इंदापूर, दौंड, शिरुर, पुरंदर व भोर या सहा तालुक्यांचा समावेश आहे. पूर्व मौसमी पावसाने धुमाकूळ घालत ६ उपकेंद्रांना तडाखा दिला. यामध्ये बारामती विभागातील लोणी देवकर, भिगवण, सणसर, काळेवाडी तर केडगाव विभागातील देऊळगाव व मलठण उपकेंद्रांचा समावेश आहे. या सर्व उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे, फांद्या कोसळल्या. त्यामुळे तारा तुटून पडल्या. मात्र यंत्रणा सतर्क असल्याने कुठेही वीज अपघात घडला नाही. सुरक्षेची पूर्ण काळजी घेत वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे.
बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांचे मार्गदर्शनाखाली बारामती मंडलाचे अधीक्षक अभियंता दिपक लहामगे वीजपुरवठा युद्धपातळीवर सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ‘वॉर रुम’ व नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत आहेत. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी लागणारे साहित्य, विजेचे खांब, रोहित्र व ऑईलचा मुबलक पुरवठा सर्व विभागांना करण्यात आलेला आहे. तसेच सर्व वीज कर्मचाऱ्यांना मुख्यालयी व मोबाईलवर उपलब्ध राहण्याचे आदेशही महावितरणने दिले आहेत.
वीजपुरवठा व विजेसंबंधिची तक्रार कोठे करावी ?
वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांनी 24 तास सुरु असलेल्या 1912, 18002333435 व 18002123435 या तीन पैकी एका टोल फ्री क्रमांकावर विजेशी संबंधित तक्रारी नोंदवाव्यात. हे क्रमांक संकेतस्थळावर व वीजबिलावर प्रकाशित केले आहेत. तक्रार नोंदविताना ग्राहकांनी त्यांचा 12 अंकी ग्राहक क्रमांक नोंदविल्यास महावितरणला त्या ग्राहकाशी संबंधित माहिती उपलब्ध होते. त्यामुळे फॉल्ट शोधण्यासाठी वेळ वाया जात नाही. महावितरणकडे नोंदविलेल्या क्रमांकावरुन 022-50897100 या क्रमांकावर मिस कॉल दिल्यास किंवा नोंदणीकृत मोबाईलवरुन “NOPOWER<ग्राहक क्रमांक>” हा संदेश टाईप करुन 9930399303 या क्रमांकावर पाठवल्यास वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंद होते व नोंदणी संदेश ग्राहकाला मिळतो. मोबाईल ॲप व www.mahadiscom.in या संकेतस्थळावरही सर्व वीज सेवा घरबसल्या उपलब्ध आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page