

भक्तिभावाने पार पडला दिव्य सोहळा
पुणे, : पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंदिरात एक ऐतिहासिक आणि भक्तिभावाने ओथंबलेला सोहळा संपन्न झाला. वीरासनातील नवीन चांदीच्या श्रीमूर्तीचे शुद्धीकरण, अभिषेक आणि सहस्त्र आवर्तन या पावन धार्मिक विधींचे आयोजन ७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी करण्यात आले.
ही नवी चांदीची श्रीमूर्ती हे केवळ एक धातूचे प्रतिक नाही, तर पुणेकरांच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि श्री गणरायाच्या चरणी असलेल्या नितांत प्रेमाचा उज्ज्वल आविष्कार आहे. शतकानुशतके पुण्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे केंद्र असलेल्या श्री कसबा गणपती मंदिराने या मंगलप्रसंगातून पुन्हा एकदा धर्मजागृती, भक्तिभाव आणि समाजातील ऐक्याचे महत्व अधोरेखित केले.
श्री कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत म्हणून केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर सामाजिक व सांस्कृतिक जिव्हाळ्याचे प्रतीक राहिले आहेत. “माझ्या मोरयाचा धर्म जागो” हा मंदिराचा ध्यास आणि ब्रीद या सोहळ्यातून अधिक दृढ झाल्याचे उपस्थित भक्तांनी व्यक्त केले.
या प्रसंगी श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री श्रीकांत शेटे म्हणाले, “ही नवी श्रीं ची मूर्ती म्हणजे श्रद्धेचा आणि भक्तीचा नवा दीप आहे. या मंगलप्रसंगाने पुण्याच्या संस्कृतीला आणि श्री कसबा गणपतीच्या परंपरेला नवचैतन्य लाभले आहे.”
रासने ज्वेलर्सचे चंद्रशेखर रासने यांच्या देखरेखीखाली सुवर्णकार आशिष माने यांनी ही सुबक मूर्ती घडविली आहे. या मंगलमय प्रसंगी मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ , मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम मंडळ , मानाचा चौथा श्री तुळशीबाग मंडळ , श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळ , श्रीमंत भाऊ साहेब रंगारी मंडळ यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या ऐतिहासिक सोहळ्याने पुणेकरांच्या भक्तिभावाला नवी उभारी दिली असून श्री गणरायाचे मंगलमय आशीर्वाद सर्वांवर सतत राहोत, अशी सर्व भाविकांची प्रार्थना आहे.