मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 35,362 रुग्णांना 299 कोटींची मदत

Photo of author

By Sandhya

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षात गेल्या वर्षभरात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सर्व सकारात्मक बदलांचा परिणाम स्पष्टपणे दिसून आला असून, 6 डिसेंबर 2024 ते 6 डिसेंबर 2025 या कालावधीत राज्यातील 35 हजार 362 रुग्णांना 299 कोटी 43 लाख 52 हजार 400 वैद्यकीय आर्थिक मदत देण्यात आली आहे.
कक्षाच्या वतीने गेल्या वर्षभरात हजारो गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत करण्यात आली. भविष्यात अधिकाधिक रुग्णांना मदत करता यावी, यासाठी त्रिपक्षीय करार, आरोग्य विषयक सर्व शासकीय योजनांचे एकत्रीकरण आदी उपक्रमांमधून गरजू रुग्णांसाठी मदतीचे मार्ग आणखी सुलभ होणार आहेत.
जिल्हा कक्षाची स्थापना
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून लाभ मिळवण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पूर्वी मुंबईत यावे लागत असे. त्यामुळे वेळ आणि पैसा खर्च होत होता. ही अडचण कायमची दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हा कक्षाची स्थापना करण्यात आली.
एफसीआरए प्रमाणपत्र
या वर्षातील सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला मिळालेले एफसीआरए प्रमाणपत्र. ही परवानगी मिळवणारा महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा भारतातील पहिला कक्ष ठरला आहे. यामुळे आता परदेशातून थेट देणग्या स्वीकारण्याची परवानगी मिळाली आहे.
आरोग्य योजनांचे एकत्रिकीकरण
राज्यातील विविध आरोग्य योजनांचे एकत्रिकीकरण करण्यात येणार आहे. सर्व आरोग्यविषयक योजनांचा लाभ एकाच प्रणालीत उपलब्ध होणार आहे. पात्रता, कागदपत्रे आणि अर्जप्रक्रिया एकसंध झाल्याने रुग्णांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यासोबतच निधी व रुग्णालयांमधील समन्वय वाढून मदत मिळण्याचा वेग वाढणार आहे. एकत्रित आरोग्य सहाय्य मॉडेलमुळे गरीब व गरजू नागरिकांना योग्य वेळी योग्य योजना मिळवणे अधिक सोपे होणार आहे.
त्रिपक्षीय करार
राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना महागड्या वैद्यकीय उपचारांचा लाभ देता यावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या पुढाकारातून त्रिपक्षीय करार लवकरच करण्यात येणार आहे. यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, कॉर्पोरेट कंपनी, रुग्णालय आणि काही प्रमाणात रुग्णांचे योगदान अपेक्षित असणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षात वर्षभरात केलेल्या सुधारणा प्रत्यक्ष रुग्णांपर्यंत पोहोचल्या. ऑनलाइन प्रक्रिया सोपी करणे, जिल्हा कक्षांची स्थापना आणि इतर नवीन उपक्रमांमुळे हजारो रुग्णांना वेळेवर मदत मिळत आहे. आर्थिक अडचणीमुळे कोणाचाही उपचार थांबू नये, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प पूर्ण क्षमतेने प्रत्यक्षात उतरतो आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page