

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ हवेली तालुक्यातील सोरतापवाडी ग्रामपंचायतीत आज उत्साहात संपन्न झाला. या अभियानाचे उद्घाटन पुणे विभागाचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार व जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामस्थ, महिला व विद्यार्थी यांच्या सहभागातून प्रभात फेरी काढण्यात आली. स्वच्छता, ग्रामविकास व जनजागृतीबाबत घोषणाबाजी करीत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अभियानाचा संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी आकर्षक चित्ररथाचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.
अभियानाचे उद्दिष्ट व कालावधीत ग्रामपंचायतीकडून होणाऱ्या कार्यवाहीबाबत प्रशिक्षक श्री.जालिंदर काकडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अभियानाची उद्दिष्टे, उपक्रम व ग्रामीण विकासासाठी आखण्यात आलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली. ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांना सहभागी करून विकास कामांना गती द्यावी व सामूहिक प्रयत्नांमुळे पुणे जिल्हा राज्यात आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुणे विभागाचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ग्रामपंचायतींना विकासाचे केंद्रबिंदू मानून कार्य करण्याचे आवाहन केले. या अभियानातून आदर्श व शाश्वत ग्रामविकासाची दिशा निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास , अप्पर आयुक्त (विकास), श्रीमती दीपाली देशपांडे, सहाय्यक आयुक्त (विकास) रविंद्र कणसे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) भुषण जोशी,हवेलीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार, सरपंच सौ. मनीषा चौधरी, उपसरपंच श्री. विलास चौधरी, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शंकर कड यांनी केले. प्रास्ताविक उपसरपंच श्री. विलास चौधरी यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. रामदास चौधरी यांनी मानले.