
पुणे: रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी सकल हिंदू समाजाच्या वतीने ‘राखी सन्मानाची, कायद्याची मागणी भगिनींची’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून राज्यभर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येणार असून, या मोहिमेअंतर्गत हिंदू महिलांनी आपल्या भागातील आमदार, खासदार, नगरसेवक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना राखी बांधून महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा तात्काळ लागू करण्याची भावनिक मागणी केली आहे.
या मोहिमेची सुरवात पुण्यातील पोलीस परेड ग्राउंड, शिवाजीनगर येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक हिंदू महिलांनी राखी बांधून झाली. यावेळी उपस्थितीत हिंदू भगिनींनी लव्ह जिहादविरोधी कायद्याची जलद अंमलबजावणी करण्याची गरज पटवून दिली. लव्ह जिहादविरोधी कायदा लवकरात लवकर करून त्वरित त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी महिलांनी केली.
या उपक्रमाचे उद्दिष्ट केवळ राखी बांधण्यापुरते मर्यादित न राहता, हिंदू भगिनींच्या सन्मानाचे आणि सुरक्षिततेचे संरक्षण करणे असून, प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या जबरदस्तीने धर्मांतर, मानसिक छळ, मारहाण, लैंगिक अत्याचार आणि आत्महत्येसारख्या गंभीर घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा आवश्यक असल्याचे महिलांनी ठामपणे मांडले.